…तर अख्खं मंत्रालय पेटवून देऊ, अखिल भारतीय मराठा महासंघाचा इशारा

जालना : पोलीसनामा ऑनलाइन – मराठा आरक्षण प्रकरणी राज्यातील विविध संघटना आक्रमक होताना दिसत आहेत. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या मातोश्री या निवासस्थानवर मराठा समाजाकडून मशाल मोर्चा काढण्यात येणार आहे. तर दुसरीकडे अखिल भारतीय मराठा महासंघाने अख्खं मंत्रालय जाळून टाकू, असा इशारा दिला आहे.

अखिल भारतीय मराठा महासंघाचे जिल्हाध्यक्ष अरविंद देशमुख म्हणाले, “सरकार जर त्यांचे भ्रष्टाचार लपवण्यासाठी मंत्रालयाचा एका मजला जाळू शकते तर आरक्षणाचा प्रश्न तातडीने मार्गी न लागल्यास मराठा समाज सगळे मंत्रालय पेटवू शकतो, असा इशारा त्यांनी दिला. अगोदरच्या सरकारचे धोरण म्हणजे शेतकऱ्यांचे मरण, असे होते. तर आताच्या सरकारचे धोरण म्हणजे मराठ्यांच्या मुलाचे मरण, असं आहे. मराठा आरक्षण प्रश्न मार्गी लागेपर्यंत शाळा, महाविद्यालय प्रवेशासह नोकर भरती न करण्याची मागणी त्यांनी केली.”

समन्वयकांना घेतले ताब्यात…
दरम्यान, आज पंढरपूर ते मंत्रालयात असा पायी दिंडी मोर्चा काढण्यात येणार होता. मात्र, जिल्हा प्रशासनाने पायी दिंडीला परवानगी नाकारली. त्यानंतर पोलिसांनी मराठा क्रांती ठोक मोर्च्यातील समन्वयकांना ताब्यात घेतले असून, त्यांना पुण्याच्या दिशेने नेण्यात आले. दहा खासगी वाहनातून पोलीस बंदोबस्तात मराठा समन्वयक पुण्यात पोहचतील. तदनंतर पुण्यात राज्याचे मुख्य सचिव यांच्यासोबत बैठक होईल, अशी माहिती मिळाली आहे.

आंदोलकांना ठेवले नजरकैदेत…
पंढरपुर ते मंत्रालय या पायी दिंडी साठी निघालेल्या मराठा तरुणांना पोलिसांनी अडवलं. पंढरपुरात १४४ कलम लागू करण्यात आले असून, जाण्यासाठी मज्जाव करण्यात आला. त्यांना कळंब पोलिसांनी नजरकैदेत ठेवले असून, कलम १४९ नुसार १२ कार्यकर्त्यांना नोटिसा बजावण्यात आल्या.