मीडियातील बातम्या चुकीच्या, शरद पवार यांना UPA अध्यक्ष बनवण्यावर कोणतीही चर्चा नाही : NCP

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीने शरद पवार हे यूपीए चेअध्यक्ष होणार असल्याच्या वृत्ताचे खंडन केले आहे. पक्षाचे नेते आणि मुख्य प्रवक्ते महेश तपासे यांनी म्हटले की -मीडियातील बातम्यांना कोणताही आधार नाही. शरद पवार यांना यूपीएचे अध्यक्ष बनवण्याबाबत अद्याप कोणताही प्रकारची चर्चा झालेली नाही. यूपीएच्या सहकार्‍यांकडून एनसीपीकडे असा कोणाताही प्रस्ताव आलेला नाही.

यापूर्वी अशी बातमी आली होती की, महाराष्ट्र आणि देशाच्या राजकारणातील दिग्गज नेत्यांपैकी एक असलेले शरद पवार यूपीएच्या अध्यक्ष पदासाठी मजबूत दावेदार म्हणून समोर आले आहेत. पुढील महिन्यात सोनिया गांधी बाजूला झाल्यानंतर ते युपीएचे अध्यक्ष निवडले जाऊ शकतात. वृत्तांमध्ये सांगण्यात आले आहे की, सोनिया गांधी यांनी पदावर राहण्यास इच्छूक नसल्याचे म्हटले आहे. सोनिया गांधी यांचे म्हणणे आहे की, योग्य नेता लवकरच मिळेल.

सोनिया गांधी दिर्घ कालावधीपासून यूपीएच्या अध्यक्ष आहेत. वृत्त असे आहे की, या पदावर कायम राहण्यास त्या इच्छूक नाहीत. याचे कारण त्यांची प्रकृती मानले जात आहे. पक्षाच्या सूत्रांचे म्हणणे आहे की, यावेळी सोनिया गांधी यांची निवृत्ती पूर्णपणे होईल. मागच्या वेळी त्या काँग्रेस अध्यक्ष पदावरून दूर झाल्या होत्या परंतु यूपीए अध्यक्ष पदावर कायम होत्या.