‘एससीओ’ बैठकीच्या निमित्ताने भारत, रशिया आणि चीनच्या परराष्ट्रमंत्र्यांची बैठक

पोलिसनामा ऑनलाईन टीम – मॉस्कोत शांघाय सहकार्य संघटनेच्या (एससीओ) होणार्‍या बैठकीत रशिया, भारत व चीन या देशांचे परराष्ट्र मंत्री भोजन बैठकीत सहभागी होणार आहेत, अशी माहिती चीनच्या परराष्ट्र मंत्रालयाने दिली आहे. एससीओच्या परराष्ट्र मंत्र्यांच्या बैठकीत भाग घेण्यासाठी परराष्ट्र व्यवहार मंत्री एस. जयशंकर हे चार दिवसांच्या दौर्‍यावर रशियाच्या राजधानीत पोहोचले आहेत.

चीनचे परराष्ट्र मंत्री वांग यी हेही एससीओच्या संबंधित द्विपक्षीय बैठका घेतल्यांनतर तिन्ही देशांच्या परराष्ट्र मंत्र्यांच्या भोजन बैठकीत सहभागी होतील, असे परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते झाओ लिजियान यांनी सांगितले आहे. आरआयसी (रशिया-भारत-चीन) चौकटीत या तिन्ही देशांचे परराष्ट्र मंत्री परस्पर हितांच्या द्विपक्षीय, क्षेत्रीय आणि आंतरराष्ट्रीय मुद्यांवर चर्चा करण्यासाठी वेळोवेळी भेटत असतात.

शांघाय सहकार्य संघटनेची स्थापना रशिया, चीन, किर्गिझ प्रजासत्ताक, कझाकस्तान, ताजिकिस्तान व उझबेकिस्तान या देशांच्या अध्यक्षांनी 2001 साली शांघायमधील एका परिषदेत केली होती. 2005 साली भारत व पाकिस्तान यांचा या गटात निरीक्षक म्हणून समावेश करण्यात आला व 2017 साली त्यांना पूर्ण सदस्य म्हणून सामावून घेण्यात आले. दरम्यान, भारत व चीन यांच्या परराष्ट्रमंत्र्यांची मॉस्कोत भेट होण्याआधी तणाव कमी करण्यासाठी पूर्व लडाखमध्ये भेट झाली, तसेच त्यांनी हॉटलाइनवरही संदेशांची देवाणघेवाण केली.