BCCI ने तात्काळ IPL च्या चौदाव्या हंगामाची तयारी केली सुरू

पोलीसनामा ऑनलाइन टीम  –    भारतात कोरोनाच्या पार्श्वभूमीवर बीसीसीआयने इंडियन प्रीमियर लीगच्या ( IPL 2020) तेरावा हंगामाचं आयोजन यूएईत केलं होते. गेल्या दीड महिन्यापासून सुरू असलेल्या स्पर्धेत मुंबई इंडियन्सने दिल्लीवर मात करत सलग पाचव्यांदा विजेतेपद पटकावलं. तेरावा हंगाम संपुष्टात आल्यानंतर बीसीसीआयने तात्काळ चौदाव्या हंगामाची तयारी सुरू केली आहे.

एका फ्रँचायझीच्या अधिकाऱ्याने इंग्रजी वृत्तपत्राला दिलेल्या माहितीनुसार, “येणाऱ्या काळात होणाऱ्या ऑक्शनसाठी तयार राहण्याचे बीसीसीआयने फ्रँचायझींना सांगितले आहे. त्याबाबत अधिकृत घोषणा करण्यात आली नाही. मात्र, बीसीसीआयने सूचना केल्यात, म्हणजे त्यांनी त्याची तयारी सुरू केली असेल. नव्या संघाचा समावेश होणार असेल, तरच ऑक्शन घेण्यात अर्थ आहे,” असे त्याने सांगितले.

तद्वत, आयपीएलचा चौदावा हंगाम भारतात घेण्यासाठी बीसीसीआय प्रयत्नशील आहे. पण कोरोनाची परिस्थिती न सुधारल्यास UAE चा पर्याय बीसीसीआयने ठेवला आहे. त्याचप्रमाणे आयपीएलमध्ये बीसीसीआय नव्या संघाच्या समावेशाची तयारी करत आहे. अहमदाबादचा संघ येणाऱ्या आयपीएलमध्ये खेळण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. यासंदर्भात लवकरच अधिकृत घोषणा करण्यात येईल.