मेट्रो ‘कारशेड’ आणि ‘नाणार’ प्रकल्प लटकणार !

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन  – विधानसभा निवडणुकीत भारतीय जनता पक्षाने सर्वाधिक जागा मिळविल्या असल्या तरी आता शिवसेनेच्या भूमिकेला सत्ता स्थापन करण्यामध्ये अत्यंत महत्व आले आहे. भाजपा किंवा विरोधक कोणीही शिवसेनेशिवाय सत्ता स्थापन करु शकत नाही. अशी सध्याची राजकीय स्थिती आहे. त्यामुळे कोणाचेही सरकार आले तरी त्यांना शिवसेनेच्या भूमिकेला विरोध करुन चालणार नाही.

त्यामुळे आगामी काळात मेट्रो कार शेड आणि नाणार प्रकल्प लटणार असल्याचे दिसून येत आहे.
लोकसभा निवडणुकीच्यावेळी भाजपाने शिवसेनेशी युती करताना नाणार प्रकल्प तेथे होणार नसल्याचे जाहीर केले होते. लोकसभा निवडणुकीनंतर महाजनादेश यात्रेत मुख्यमंत्री नाणार येथे गेले. तेव्हा त्यांनी आता लोकांचे मत बदलले आहे. प्रकल्प येथेच होणार अशी घोषणा केली होती. पण आता अशी परिस्थिती आहे की, शिवसेनेचा होकार असल्याशिवाय हा प्रकल्प कोणालाही पुढे रेटता येणार नाही.

विधानसभा निवडणुकीदरम्यान आरे येथील मेट्रो कार शेडचा प्रकल्प व आरेतील झाडे तोडण्याचा मुद्दा पुढे आला. शिवसेनेचे नेते आदित्य ठाकरे यांनी वृक्षतोडीला विरोध करुन निवडणुकीनंतर त्याविरोधात दाद मागू असे म्हटले होते. आता आदित्य ठाकरे हे निवडून आले असून कदाचित ते उपमुख्यमंत्रीही होतील. त्यामुळे आता त्यांना आपल्या भूमिकेपासून मागे जाता येणार नाही.

१९९५ मध्ये शिवसेनेची सत्ता आली असताना त्यांनी सुरुवातीला एनरॉन प्रकल्प समुद्रात बुडवू अशी घोषणा केली होती. हा प्रकल्प रद्द करुन तत्कालीन मुख्यमंत्री मनोहर जोशी यांनी आपली घोषणा खरी केली होती. त्यानंतर एनरॉनच्या तत्कालीन अध्यक्षा शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांना भेटल्या. त्यानंतर शिवसेनेच्या सरकारने दुसऱ्या टप्प्यासह संपूर्ण एन्रॉन प्रकल्पाला पुन्हा मंजुरी दिली होती.त्यामुळे पुढे मागे नाणार प्रकल्प व आरे मेट्रो कार शेडला शिवसेनेकडून परवानगी मिळू शकते. मात्र, सध्या तरी हे दोन्ही प्रकल्प लटणार हे निश्चित झाले आहे.