Coronavirus : महाराष्ट्रात शिरकाव ! दुबईहुन पुण्यात आलेल्या दोघांपैकी एकामध्ये कोरोनाची ‘सौम्य’ लक्षणे आढळली

पुणे : पोलीसनामा ऑनलाईन – दुबई येथून पुण्यात आलेल्या दोघांपैकी एका रुग्णात कोरोनाचे सौम्य लक्षणे आढळून आली आहेत. त्यांच्यावर नायडु हॉस्पिटलमधील विलगीकरण कक्षामध्ये उपचार सुरु आहेत, अशी माहिती विभागीय आयुक्त डॉ. दीपक म्हैसेकर आणि पुण्याचे जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांनी दिली. भारतात आतापर्यंत कोरोनाचे ४३ रुग्ण आढळून आले आहेत. त्यांच्यावर देशभरातील विविध हॉस्पिटलमध्ये उपचार करण्यात येत आहे.

पुण्यात कोरोनाची लक्षणे आढळलेला हा पहिलाच रुग्ण आहे. दुबई येथे जाऊन आलेल्या या दोन रुग्णांना खबरदारीचा उपाय म्हणून विलगीकरण कक्षात ठेवण्यात आले आहे. त्यातील एक रुग्णामध्ये कोरोनाची सौम्य लक्षणे दिसून येत आहे. तर दुसर्‍या रुग्णामध्ये अद्याप लक्षणे आढळून आलेली नाही. या रुग्णांच्या संपर्कात आलेल्यांची माहिती घेऊन त्यांच्यावर बारीक लक्ष ठेवण्यात येत आहे.

नागरिकांनी घाबरुन जाण्याचे काहीही कारण नाही. होळी, धुळवड, तुकाराम बीज तसेच गांवोगावी भरणार्‍या यात्रा व ऊरुसांच्या पार्श्वभूमीवर गर्दीच्या ठिकाणी जाण्याचे टाळण्याचे आवाहन प्रशासनाने केले आहे. होळी सण आपल्या कुटुंबियांसोबतच साजरा करण्याचे आवाहन विभागीय आयुक्त डॉ. दीपक म्हैसेकर आणि पुण्याचे जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांनी केले आहे.