दूध दराच्या आंदोलनादरम्यानच भाजपानं राजू शेट्टींवर केला गंभीर आरोप

ADV

पोलीसनामा ऑनलाइन टीम  –   राज्यात, देशात मोठ्या प्रमाणात दूध पावडर उपलब्ध असताना मोदी सरकारने १० हजार मेट्रिक टन दूध पावडर आयात केल्याने शेतकऱ्यांचे मोठे नुकसान होणार असल्याचं काही दिवसांपूर्वी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांनी म्हटलं होत. या प्रकरणी भाजपा किसान मोर्चाचे प्रदेशाध्यक्ष व माजी कृषिमंत्री डॉ. अनिल बोंडे यांनी अप्रत्यक्षपणे शेट्टी यांच्यावर निशाणा साधत, दूध उत्पादकांना रास्त भाव देण्यात महाविकास आघाडीला सरकारला आलेले अपयश झाकण्यासाठी काही मंडळी केंद्र सरकारने दूध पावडर आयात केली असल्याची खोटी माहिती पसरवत असल्याचा आरोप केला आहे.

भारतीय जनता पार्टीने मोठ्या अडचणीत सापडलेल्या दूध उत्पादकांच्या मागण्यांसाठी राज्य सरकारचे लक्ष वेधून घेण्यासाठी राज्यभर आंदोलन केले होते. तसेच महाविकास आघाडीला समर्थन देणारे राजू शेट्टी यांनी, केंद्र सरकारने दूध पावडर आयात केल्याने दूध उत्पादकांना भाव वाढवून मिळत नसल्याचे सांगत २१ ऑगस्ट रोजी आंदोलन केले होते. यावरती बोलताना भाजपाच्या अनिल बोंडे यांनी म्हटलं की, प्रत्यक्षात केंद्र सरकारने दूध पावडर आयात केलीच नसल्याची माहिती मिळाली आहे. वाणिज्य मंत्रालयातून देण्यात आलेल्या माहिती नुसार २३ जून रोजी केंद्र सरकारच्या अर्थ विभागाद्वारे प्रसिद्ध करण्यात आलेल्या सूचनेमध्ये गॅट करारान्वये भारताला आयात करावयाच्या वस्तूंबद्दल माहिती दिलेली आहे. मनमोहन सिंह यांच्या पंतप्रधानपदाच्या कार्यकाळात जागतिक व्यापार संघटनेची ही बंधने मान्य केलेली असल्याचं त्यांनी सांगितलं.

आरोप निराधार आणि फसवा

‘भारत सरकारला गॅट कराराप्रमाणे २०१४-२०१५ ते २०१९-२०२० या कालावधीत ५ लाख मेट्रिक टन मका, १० हजार मेट्रिक टन दूध व मलाई पावडर रुपात, सूर्यफूल तेल दीड लाख मेट्रिक टन, रिफायन्ड सरकी, मोहरी तेल दीड लाख मेट्रिक टन घेणे आवश्यक आहे. याबाबत सूचना काढल्यानंतर मका, दूध पावडर आयात करण्यात आल्याची अफवा उठवण्यात आली. मात्र, नाफेड व अन्य एका संस्थेला ५ लाख मेट्रिक टन मका आयात परवाना देण्यात आला होता. या परवान्याची मुदत फेब्रुवारी २०२१ पर्यंत असली तरी अद्याप पर्यंत मका आयात करण्यात आलेली नाही.’

तसेच गॅट करारा नुसार १० हजार मेट्रिक टन दूध पावडर आयात करण्याचे बंधनकारक असले तरी कोणत्याही आयातदारचे इच्छापत्र दिलेले नाही व कोणालाही आयतीचा परवाना देण्यात आलेला नाही. म्हणून दूध पावडर आयात करण्यात आली हा दावा पूर्णतः निराधार व फसवा आहे. असं अनिल बोंडे म्हणाले.