महाविकासमधील तिन्ही पक्षातील नेत्यांना दिला जातो निधी, कोणतीही काटकसर केली जात नसल्याचं अब्दुल सत्तारांनी सांगितलं

रत्नागिरी : पोलीसनामा ऑनलाइन – “काँग्रेसची सत्ता असलेल्या महापालिकांना मुख्यमंत्र्यांकडून निधी मिळत नाही. त्यामुळे नांदेडलाही निधी मिळाला नाही. मात्र, आपण सार्वजनिक बांधकाम खात्याकडून निधी मिळवून दिला,” असे वक्तव्य सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण यांनी परभणीत वार्ताहरांना बोलताना केले होते. त्याला आता महसूल राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांनी “मुख्यमंत्री निधी देताना कोणत्याही प्रकारची काटकसर करत नाहीत,” असे प्रत्युत्तर दिले आहे.

“महाविकास आघाडीतील तिन्ही पक्षांच्या नेत्यांच्या खात्या सोबत त्यांच्या मतदार संघापर्यंत निधी देण्यात येतो. तिन्ही पक्षांच्या लोकप्रतिनिधींचा मुख्यमंत्री नेहमी सन्मान करतात. मुख्यमंत्री निधी देताना कोणत्याही प्रकारची काटकसर करत नाहीत. कुठे तरी एका दुक्का चुकला असेल. महाविकास आघाडीचे सरकार पहिले सरकार की जिथे मंत्र्यांना इतके अधिकार देण्यात आले आहे. मुख्यमंत्री इतक्या पारदर्शक पद्धतीने काम करत आहेत,” असे म्हणत त्यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे कौतूक केले आहे.

दरम्यान, महाविकास आघाडीतील नेत्यांना मराठा आरक्षण मिळू नये असे वाटत, अशी टीका भाजपचे नेते गिरीश महाजन यांनी केली होती. त्याला प्रत्युत्तर देताना सत्तार म्हणाले की, गिरीश महाजन यांनाच मराठा समाजाला आरक्षण मिळू नये, असे वाटत असावे. महाविकास आघाडीतील सर्व नेत्यांना आरक्षण मिळावे असं वाटत. पण ज्यांना असे वाटत नाही, तेच लोक दुसऱ्याच्या खांद्यावर बंदूक ठेवून गोळ्या चालवतात, असा टोला देखील त्यांनी महाजनांना हाणला.