‘ मी अजूनही निवडणुकीच्या रिंगणात , उद्धव ठाकरेंनी आदेश दिल्यास लोकसभा लढणार ‘

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – मी अजूनही निवडणुकीच्या रिंगणात असून निवडणूक लढण्यास इच्छुक आहे . इतकेच नाही तर, शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हे माझ्याबाबतीय योग्य निर्णय घेतील , असे दुग्धविकास राज्यमंत्री अर्जुन खोतकर यांनी म्हटलं आहे. इतकेच नाही तर , शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी आदेश दिला तर पुन्हा लोकसभा निवडणुका लढणार असल्याचंही त्यांनी सांगितलं . बुधवारी (दि- 13 मार्च) खोतकर यांनी ‘मातोश्री’वर जाऊन उद्धव ठाकरे यांची भेटही घेतली. उद्धव ठाकरे यांच्यापुढे दानवे यांनी शिवसैनिकांना दिलेल्या त्रासाचा त्यांनी पाढाही यावेळी वाचून दाखवला.

एका वृत्तवाहिनीच्या कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी बोलताना अर्जुन खोतकर म्हणाले की, “मी अजूनही निवडणुकीच्या रिंगणात आहे. उद्धव ठाकरेंनी आदेश दिल्यास लोकसभा निवडणूक लढण्यास आपण तयार आहोत. उद्धव ठाकरेंचा जो निर्णय असेल तो मला मान्य असेल. उद्धव ठाकरे माझ्या हिताचाच निर्णय घेतील. पण अद्याप माझ्यापर्यंत कोणताही निर्णय पोहोचलेला नाही.” असे खोतकर यांनी स्पष्ट केले.

दोन दिवसांपूर्वी शेकडो शिवसैनिकांनी राज्यमंत्री अर्जुन खोतकर यांच्या घरी ठिय्या आंदोलन सुरू केले होते. भारतीय जनता पक्षाचे  महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांच्याविरोधात अर्जुन खोतकर यांनी निवडणूक लढवावी अशी या शिवसैनिकांची मागणी होती. यासाठी त्यांनी खोतकरांच्या घरी ठिय्या आंदोलन सुरू केले होते . दानवे खोतकर वाद मिटवण्यासाठी आजवर अनेक बैठकाही पार पडल्या होत्या . दानवे आणि खोतकर यांच्यातील राजकीय वैर हे शिवसेना – भाजप युतीसाठी डोकेदुखी ठरत आहे.