सुशांत आणि दिशा प्रकरणात महत्त्वाचा धागा हाती ? आमदार नितेश राणेंचे केंद्रीय गृहमंत्र्यांना पत्र

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन –   बॉलिवूड अभिनेता सुशांतसिंह राजपूत याच्या मृत्यूनंतर अनेकांनी प्रश्नचिन्ह उपस्थित केले होतं. सुशांतने आत्महत्या केली नसून त्याची हत्या करण्यात आली असल्याचा दावा करण्यात येत आहे. या प्रकरणाचा तपास करणाऱ्या मुंबई पोलिसांच्या तपासावर देखील प्रश्न चिन्ह उपस्थित करत सीबीआय चौकशीची मागणी केली होती. त्यानंतर हे प्रकरण कोर्टात गेल्यानंतर या प्रकरणाचा तपास सीबीआयकडे सोपवण्यात आला.

सुशांत प्रकरणाच्या या सर्व घटामोडीत भाजपा नेते नारायण राणे यांनी सुशांतची मॅनेजर दिशा सालियन हिच्यावर बलात्कार झाल्यानंतर हत्या करण्यात आली असल्याचे पत्रकार परिषदेत म्हटले होते. दिशाच्या मृत्यूनंतर सहा दिवसातच सुशांतचा मृतदेह त्याच्या बेडरुमध्ये आढळून आला. सुशांतने गळफास घेऊन आत्महत्या केली असा प्राथमिक अंदाज होता. मात्र, यानंतर त्याच्या मृत्यूवर संशयाचे ढग निर्माण झाले. राज्यातील एका बड्या नेत्याचे नाव या प्रकरणाशी जोडले गेल्यानंतर आमदार नितेश राणे यांनी दिशा सालियन आणि सुशांत प्रकरण एकमेकांशी लिंक असल्याचा दावा केला आहे.

नितेश राणेंचे अमित शहांना पत्र

आमदार नितेश राणे यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांना पत्र लिहले आहे. या पत्रात त्यांनी म्हटले आहे की, सुशांत आणि दिशा सालियन यांच्या हत्येचा तपास सध्या सुरु आहे. यामध्ये दिशासोबत लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये राहणारा रोहन रॉय याची कोणतीही चौकशी मुंबई पोलिसांनी केलेली नाही. ज्या दिवशी दिशा इमारतीवरून खाली पडली तेव्हा रोहन रॉय त्या ठिकाणी उपस्थित होता. दिशा खाली पडल्यानंतर रोहन 20 ते 25 मिनिटांनी प्लॅटमधून खाली आला होता. त्यामुळे त्याच्या वागणूकीवर संशय निर्माण होतो.

केंद्राने रोहन रॉयला सुरक्षा द्यावी

राणे यांनी आपल्या पत्रात पुढे म्हटले आहे की, रॉय याने मुंबई सोडून जावी यासाठी त्याला धमकावण्यात आले असावे. मुंबईत या प्रकरणाची चौकशी सुरु असल्याने त्याला मुंबईत येण्याची भीती वाटत असावी. कोणीतरी या प्रकरणात रोहन याच्यावर दबाव टाकून त्याला धमकावण्याचा प्रयत्न करत असल्याचा दावा राणे यांनी केला आहे. त्यामुळे रोहन रॉयला केंद्र सरकारकडून सुरक्षा प्रदान करण्यात यावी जेणेकरुन तो मुंबईत आल्यानंतर सुरक्षित राहील.

रोहन रॉय दिशा आणि सुशांत प्रकरणातील दुवा

नितेश राणे यांनी पुढे म्हटले आहे की, रोहन रॉय हा दिशा सालियन आणि सुशांतसिंह राजपूत प्रकरणातील मुख्य दुवा आहे. त्याच्या जबाबानंतर अनेक खुलासे बाहेर येतील. दिशा आणि सुशांत मृत्यू प्रकरण एकमेकांशी संबंधित आहे, असे स्पष्ट मत आमदार नितेश राणे यांनी पत्रात मांडले आहे.