‘चौकीदार चोर है’ पेक्षा ‘ए लाव रे तो व्हिडीओ’ चा विरोधकांना धसका ; मीम्स व्हायरल

पुणे : पोलीसनामा ऑनलाईन – महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी लोकसभा निवडणूकीत भाजपविरोधात आपली मोहिम उघडली आहे. राज्यभरातील सभांमधून ते पुराव्यांसह मोदी सरकारवर हल्लाबोल करत आहेत. त्यांच्या ‘ए लाव रे तो व्हिडीओ’ या वाक्याने सोशल मिडीयावर अक्षरश: धूमाकूळ घातला आहे. सध्या ‘चौकीदार चोर है’ पेक्षा ‘ए लाव रे तो व्हिडीओ’ ची दहशत विरोधकांमध्ये असल्याच्या अनेक पोस्ट फेसबुक आणि ट्विटरवर करण्यात आल्या आहेत.

राज ठाकरे यांनी काही दिवसांपुर्वी मनसे लोकसभा निवडणूक लढविणार नाही. परंतु पंतप्रधान मोदींविरोधात आपण प्रचार करणार असल्याचे जाहीर केले. त्यानंतर त्यांनी नांदेड, सोलापूर, इचलकरंजी येथे सभा घेऊन मोदींविरोधात जोरदार बॅटींग करण्यास सुरुवात केली. मादींची विधाने, सरकारच्या योजना यांची पोलखोल करणारे व्हिडीओ दाखवून त्यांनी नरेंद्र मोदी आणि भाजपच्या सरकारला उघडं पाडलं आहे. यासंदर्भातील भाषणं करताना ते पुराव्यांसकट पोलखोल करत आहेत. ही पोलखोल नेटकऱ्यांच्या प्रचंड पसंतीस उतरलेली दिसते. त्यांनी जाहीर सभांमध्ये ‘ए लाव रे तो व्हिडीओ’ असं बोललेलं वाक्य घेऊन नेटीझन्सनी आपल्या पोस्ट व्हायरल केल्या आहेत. अनेकांनी राज ठाकरे यांच्या प्रचाराची ही स्टाईल आवडली असल्याचे म्हणत आता या व्हिडीओंचा धसका विरोधकांनी घेतल्याचे मत मांडले आहे.

सोशल मिडीयावर या चार शब्दांनी धूमाकूळ घालत चांगलीच चर्चा रंगवली आहे.