राज ठाकरेंची हिंदुत्वाची भूमिका खुपच गडद, सेना नेत्यांच्या पक्षप्रवेशानंतर शांती पाठाचं पठण

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांचा एक व्हिडीओ सध्या समाज माध्यमात व्हायरल होत आहे. त्यामध्ये राज ठाकरे यांच्यासमोर शांतीपाठाचं पठण करण्यात येत आहे. जानेवारी महिन्यात राज ठाकरे यांनी हिंदुत्वाची भूमिका घेतली होती. या व्हिडिओच्या माध्यमातून हीच भूमिका ठळक होत असल्याची चर्चा सगळीकडे सुरु आहे.

औरंगाबादमध्ये शिवसेनेच्या काही कार्यकर्त्यांनी राज ठाकरे यांच्या उपस्थितीत मनसेत प्रवेश केला. जिल्हा अध्यक्ष सुहास दशरथे यांच्या माध्यमातून झालेल्या या प्रवेश सोहळ्याप्रसंगी वेदमूर्ती ज्योतिषाचार्य अनंत पांडव गुरुजी यांनी राज ठाकरे यांच्या समोर शांतीपाठाचं पठण करण्यात आलं. एका मराठी वृत्तवाहिनीने याबाबतचे वृत्त दिलं आहे.

निष्ठावंतांची शिवसेनेला सोडचिट्टी…

औरंगाबाद महापालिका निवडणुकांच्या तोंडावर शिवसेनेचे निष्ठावंत कार्यकर्ते आणि नगरसेवकांनी मनसेत प्रवेश केला आहे. हा शिवसेना आणि चंद्रकांत खैरे यांच्याकरिता मोठा धक्का मानला जातोय. औरंगाबाद शिवसेनेत उपशहर प्रमुख, जिल्हा संघटक अशी पदे भूषविलेल्या सात बड्या शिवसैनिकांनी मनसेत प्रवेश केला आहे. महापालिका निवडणुकांचे बिगुल कधीही वाजण्याची शक्यता असून, मनसेने कंबर कसली आहे. त्याच पार्श्वभूमीवर महापालिका निवडणुकीत समिकरणे बदलण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

राज्य ठाकरेंच्या लूकची चर्चा…

टाळेबंदीच्या काळात लोक घरातच अडकून पडले आणि अक्षरशः सलूनमध्ये जाणंही अवघड झालं होत. त्यामुळे नेत्यांपासून ते सामान्य नागरिकाचे लूक आपोआप बदल आहेत. अशातच आता मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या बदलेल्या लूकची चर्चा सर्वत्र होत आहे. राज ठाकरे यांनी दाढी वाढवली असून गॉगल्स घातलेला ब्लॅक अँड व्हाईट फोटो समाज माध्यमावर त्यांच्या चाहत्यांकडून शेअर करण्यात येत आहे. याआधी सुद्धा राज ठाकरे यांच्या निरनिराळे लुक्स चर्चेचा विषय झाले होते.