‘आम्ही शिवसेनेसारखं लग्न एकाबरोबर अन् लफडं दुसर्‍यासोबत केलं नाही’ : मनसे

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – महाराष्ट्र नवनिर्माण सेना सुपारी घेतल्याशिवाय काम करूच शकत नाही, असे ताशेरे शिवसेनेचे नेते तथा परिवहनमंत्री अनिल परब यांनी ओढले होते. त्यावर आता मनसेचे नेते संदीप देशपांडे यांनी जोरदार हल्ला चढवला आहे. ‘शिवसेनेचं लग्न एकाशी आणि लफडं दुसऱ्याबरोबर’ असल्याची खोचक टीका देशपांडे यांनी केली आहे.

संदीप देशपांडे म्हणाले, “मनसेने जे केलं ते उघडपणे केलं. आमच्या पोटात एक ओठात एक असे केलं नाही. २०१९ साली आम्हाला जी भूमिका देशहिताची वाटली ती आम्ही देशासमोर मांडली. आम्ही शिवसेनेसारखे लग्न एकाबरोबर आणि लफडं दुसऱ्यासोबत असे केलं नाही. त्याचसोबत शिवसेनेनं मराठी आणि हिंदू लोकांसोबत दगाबाजी केली. म्हणून आताची शिवसेना ही दगाबाज शिवसेना असल्याचे,” म्हणत देशपांडे यांनी शिवसेनेवर टीकास्त्र सोडले.

काय म्हणाले होते अनिल परब

Advt.

“मनसे सुपारी घेतल्याशिवाय कामच करू शकत नाही. म्हणून कोणाची तरी सुपारी त्यांना घ्यावी लागेल. मनसेचे अस्तित्व सुपारीवर चालू आहे. आजवर विविध पक्षांची सुपारी मनसेने घेतली. ज्या भाजप नेत्यांना लोकसभेत ‘लाव रे तो व्हिडिओ’ माध्यमातून उघडं नागडं केलं, त्यामुळे आता नागड्यासोबत उघडा झोपला तर काय परिस्थिती होते हे कदाचित पुढे समोर येईल, असा घणाघात करत मुंबई महापालिका निवडणुकीत शिवसेना जिंकेल,” असा विश्वास अनिल परब यांनी व्यक्त केला.

भाजपला सत्तेत येण्यासाठी ५ वर्षे स्वप्न पाहावी लागेल

“सत्तेविना भाजप अस्वस्थ झाली असून, सत्तेवर येण्यासाठी भाजपला ५ वर्षे स्वप्न पाहत काढावी लागणार आहेत. ५ व्या वर्षी पुन्हा एकदा भाजपचे स्वप्नभंग होईल. कार्यकर्ते कुठेही जाऊ नये म्हणून भाजप नेत्यांना सत्ता येणार असल्याची विधाने करावी लागतात. पुढचं सरकार दिवसाढवळ्या येईल तेसुद्धा शिवसेनेचे असेल,” असा चिमटा परब यांनी काढला.