‘वेळ पडली तर मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनाही…’, राज्यपालांच्या भेटीनंतर राज ठाकरे आक्रमक

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन –   वाढीव वीज बिलाच्या मुद्द्यावर वेळ पडली तर मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंची (CM Uddhav Thackeray) भेट घेऊ असं वक्तव्य मनसे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी केलं आहे. वाढीव वीजबिलासंदर्भात राज्यपाल भगत सिंह कोश्यारी (Bhagat Singh Koshyari) यांची भेट घेतल्यानंतर ते माध्यमांशी बोलत होते. राज्यापालांना भेटल्यांतर ते म्हणाले, सरकार आणि राज्यपालांचं सख्य असल्यानं विषय किती पुढे जातील याची कल्पना नाही. परंतु ते सरकारसमोर गोष्ट मांडतील अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली आहे.

राज ठाकरे म्हणाले, “नितीन राऊत (Nitin Raut) यांच्याशी बोलणं झालं आहे. ते लवकरात लवकर निर्णय घेऊ असं म्हणाले आहेत. परंतु अजून तो होत नाही. राज्यपालांशी बोलल्यानंतर त्यांनी शरद पवारांशी (Sharad Pawar) बोलून घ्या असं सांगितलं. मी पवार साहेबांशीही बोलणार आहे. मला वाटतं हा विषय राज्य सरकारला माहिती आहे. तर मग प्रकरण कशात अडकलं आहे कळत नाही.” अशी टीका त्यांनी केली.

पुढं बोलताना राज ठाकरे म्हणाले, “याचा निर्णय तात्काळ घ्यायला पाहिजे. त्याच्यासाठी पहिलं निवेदन राज्यपालांना दिलं आहे. शरद पवारांशी फोनवरून किंवा प्रत्यक्षात जाऊन चर्चा करणार. वेळ पडली तर मुख्यमंत्र्यांना भेटणार. हा विषय त्यांना माहिती नाही असं नाही. अर्थात त्यांना कोणतीही गोष्ट सांगितली की, त्यावर काम सुरू आहे असं सांगतात पण त्यावर निर्णय होत नाही.” असा चिमटाही त्यांनी काढला आहे.