बांगलादेशी घुसखोरांविरुद्धच्या मोर्चावरून मनसे-शिवसेनेत ‘खडाजंगी’

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – घुसखोरांविरुद्ध आज निघणाऱ्या मनसेच्या महामोर्चामगे भाजपचा हात असल्याचे आरोप शिवसेनेने केले आहे. शिवसेनेने केलेल्या आरोपाला मनसेने जोरदार प्रत्युत्तर दिले असून शिवसेनेच्या पायाखालची वाळू सरकल्याचं हे लक्षण आहे, असा पलटवार मनसेच्या नेत्यांनी केला आहे.

मराठीच्या मुद्यावरून राजकारण करणाऱ्या मनसेने आपल्या पक्षाचा झेंडा बदलून राजकीय भूमिका बदलल्याचे संकेत दिले. मनसेच्या झालेल्या महाअधिवेशनामध्ये मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी हाच मुद्दा उचलून धरत महामोर्चा काढणार असल्याची घोषणा केली. मनसेने आपल्या पक्षाचा झेंडा बदलल्याने मनसे हिंदुत्वाची कास धरत असल्याचे स्पष्ट झाले. मनसेने बदललेल्या भूमिकेचा भाजपने फायदा घेत शिवसेनेला शह देण्यासाठी ही खेळी केल्याचे शिवसेनेला वाटत आहे. शिवसेनेच्या प्रवक्त्या मनीषा कायंदे यांनी प्रसारमाध्यमाशी बोलताना भाजपवर आरोप केला आहे.

शिवसेनेने केलेल्या आरोपाला मनसे नेत्यांनी जोरदार प्रत्युत्तर दिले आहे. मनसे नेते अनिल शिदोरे यांनी शिवसेनेचा आरोप खोडून काढत पाकिस्तान विरोधाची मनसेची भूमिका आजची नसल्याचे सांगितले. यापूर्वी आम्ही त्यांच्या विरोधात आंदोलनं केली. त्यामुळे या आरोपात तथ्य नसल्याचे शिदोरे यांनी म्हटले आहे. तर मनसेचे सरचिटणीस संदीप देशपांडे यांनी शिवसेनेवर हल्लाबोल केला. शिवसेना हीच राष्ट्रवादी काँग्रेसची बी टीम आहे. मनसेच्या महामोर्चावरून त्यांच्याकडून होत असलेली टीका हे त्यांच्या पायाखालची वाळू सरकल्याचे लक्षण असल्याचे देशपांडे यांनी म्हटले आहे.