‘शिवजयंती नव्हे तर टीपू सुलतान जयंती साजरी करणार का ?, वेळीच नियमावली बदला, अन्यथा…’

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्यातील सर्व सण उत्सव साध्या पद्धतीने साजरे करण्याचे आवाहन राज्य सरकारने केले. याला राज्यातील जनतेने प्रतिसाद दिला. मात्र, आता राज्यातील कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झाला आहे. 19 फेब्रुवारीला साजरी केली जाणारी शिवजयंती देखील साध्या पणाने साजरी करण्याचे आवाहन करुन राज्य सरकारने मार्गदर्शक सूचना जारी केल्या आहेत.तसेच मार्गदर्शक सूचनांचे पालन करण्याचे आदेश गृह विभागाने दिले आहेत. यामुळे शिवप्रेमींमध्ये नाराजी पसरली आहे.

महाराष्ट्रात शिवजयंती मोठ्या उत्साहात साजरी केली जाते. मात्र, यंदाच्या शिवजयंतीवर कोरोनाचं सावट असल्याने राज्य सरकारकडून विशेष खबरदारी घेतली जात आहे. यातच मिरवणूका काढू नका, 100 पेक्षा जास्त जणांनी जमा होऊ नये असे आदेश राज्य सरकारने काढले आहेत. यामुळे शिवप्रेमींमध्ये प्रचंड नाराजी पसरली आहे.

यातच विरोधकांनी ठाकरे सरकारवर निशाणा साधला आहे. मनसे नेते बाळा नांदगावकर यांनी शिवजयंती हा आपला वर्षातील सर्वात मोठा सण आहे. ज्या छत्रपती शिवाजी महाराजांमुळे आपण आहोत त्यांची जयंती साजरी करतांना कसली बंधने टाकताय. आजान स्पर्धा भरवणारे, बारची वेळ सारखी वाढवून देणारे, विविध निवडणुकीत कोरोना नियमांची पायमल्ली चालते आणि शिवजयंतीला नियमावली असा प्रश्न नांदगावकर यांनी उपस्थित केला आहे.

तसेच आपल्या महाराष्ट्रात शिवजयंती साजरी करणार नाही तर काय टिपू सुलतानची साजरी करणार का ? वेळीच ही नियमावली बदला, जनतेला गृहीत धरू नका असा थेट इशाराच मनसे नेते बाळा नांदगावकर यांनी अप्रत्यक्षपणे शिवसेनेला आणि राज्य सरकारला ट्विटच्या माध्यमातून दिला आहे.

पेंग्विन पहायला यायचं हं !
भाजपनेही शिवसेनेला लक्ष्य केलं आहे, भायखळ्यात पेंग्विन पहायला 16 फेब्रुवारी पासून यायचं हं. सरकारचं असं आमंत्रण आलय बरं कां. पण खबरदार जर जयंतीला छत्रपती शिवाजी महाराजांना अभिवादन करायला जमलात तर. असे सरकारचे आदेश पण आलेत. त्यामुळे सांभाळा ! अजब वाटले तरी नियम पाळा !! ठाकरे सरकार करेल, तेच नियम आणि तेच कायदे !, असे म्हणत भाजप नेते आशिष शेलार यांनी ठाकरे सरकारवर निशाणा साधला आहे.

गृह विभागाने दिलेली नियमावली
– यंदा गर्दी न करता साधेपणाने शिवजयंती साजरी करावी
– मिरवणुक, सादरीकरण किंवा सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करु नये
– केवळ 100 व्यक्तींच्या उपस्थितीतच शिवजयंती साजरी करावी, बाईक रॅली किंवा मिरवणुक काढू नये.
– आरोग्य विषय उपक्रम आणि शिबीर यांची जनजागृती करावी
– सोशल डिस्टन्सिंग आणि स्वच्छतेविषयक नियम पाळण्याकडे अधिकचे लक्ष द्यावे
– स्थानिक जिल्हा प्रशासनाच्या सूचनांचे पालन करावे.