बारामतीत माय-लेकराचे एकाच वेळी 10 वीत यश

पोलिसनामा ऑनलाईन – बारामतीत मुलानेच आपल्या आईला दहावीत उत्तीर्ण व्हावे यासाठी स्वतःच्या अभ्यासाबरोबर तिचाही अभ्यास घेतला. त्यामुळे काल लागलेल्या निकालात दोघांनी दहावीच्या परीक्षेत घवघवीत यश मिळवल्याने त्यांचे सर्वत्र कौतुक होत आहे. बारामती तालुक्यातील पारवडी गावातील गुरव कुटुंबात दहावीच्या परिक्षेचा निकालाचा आनंद व्दिगुणित आहे. बेबी गुरव आणि सदानंद गुरव अशी त्यांची नावे आहेत.

आईने दोन्ही मुलांच्या मदतीने माध्यमिक शालांत परीक्षेत 64.40 टक्के गुण मिळवत पास होण्याचे स्वप्न पूर्ण केले आहे. त्यांच्या थोरल्या मुलाने देखील दहावीच्या परीक्षेत 73.20 टक्के गुण मिळवले आहे. या वर्षी मुलगा सदानंद आईचा शिक्षक बनला. त्यामुळे त्याचा ही अभ्यास झाला. कधी आई स्वयंपाक करताना शेजारी बसून जेवताना दोन्ही मुले आईला मार्गदर्शन करीत होते. पुढे बारावीची परिक्षा पास होऊन पदवी मिळवण्याचा त्यांची महत्वकांक्षा आहे. बेबी गुरव या बारामती टेक्सटाईल पार्कमध्ये पायोनिअर कॅलिकोज कंपनीमध्ये शिवणकाम करतात. त्यांचा मुलगा सदानंद गुरव हा रयत शिक्षण संस्थेच्या नागेश्वर विद्यालय शेटफळगढे ता. इंदापूर येथे दहावीत शिकत होता. तर धाकटा मुलगा आठवीत शिकत होता. त्यांनी पतीच्या आग्रहास्तव दहावीची परिक्षा देण्याचा निर्णय घेतला.