गडगा येथे दूध संकलन केंद्र बंद करून आंदोलन ! ‘मागण्या मान्य न झाल्यास आंदोलन तीव्र होणार’, रयत क्रांती संघटनेचा इशारा

नांदेड : पोलीसनामा ऑनलाइन – रयत क्रांती संघटनेचे युवा आघाडीचे प्रदेशाध्यक्ष पांडुरंग शिंदे मांजरमकर यांच्या नेतृत्वाखाली गडगा येथे दूध संकलन केंद्र बंद करून दूध बंद एल्गार आंदोलन करण्यात आले आणि सरकारच्या विरोधात घोषणा बाजी करत सरकारचा निषेध केला.

साहित्यसम्राट अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्त त्यांच्या प्रतिमेला अभिवादन करून आंदोलनाची सुरुवात रयत क्रांती संघटनेने केली.

यावेळी पांडुरंग शिंदे म्हणाले, २१ जुलै रोजी संपूर्ण राज्यात महायुतीच्या वतीने राज्य सरकारला दूध उत्पादक शेतकऱ्याच्या मागण्याचे निवेदन दिले होते. 1 ऑगस्ट पर्यंत सरकारला अल्टिमेट दिला होता. सरकार दूध उत्पादक शेतकऱ्यांचे प्रश्न सोडवण्यासाठी गंभीर दिसत नाहीये त्यामुळे आज श्रमिकाचा आवाज साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांच्या जयंती दिवशी त्यांच्या प्रतिमेस अभिवादन करून आज संपूर्ण राज्यामध्ये हे आंदोलनाची सुरुवात झालेली आहे. सरकार जर शेतकऱ्यांचे प्रश्न सोडवत नसेल तर भविष्य काळामध्ये हे आंदोलन अधिकाधिक तीव्र होईल सरकारला याचे परिणाम भोगाव लागतील.

हे तिघाडी सरकार शेतकऱ्यांचे प्रश्न सोडवण्यासाठी सपशेल अपयशी ठरले आहे कारण सोयाबीनच्या बोगस बियाणांमुळे शेतकऱ्यांना दुबार पेरणी करावी लागली. बाजारांमध्ये आज युरियाचा तुटवडा आहे ते शेतकऱ्यांना वाढीव किंमतीत घ्यावे लागत आहे .दुसरीकडे कर्जमाफी फसवी ठरलेली आहे. शेतकऱ्यांना नवीन कर्ज मिळत नाहीये अशा अनेक समस्यांना शेतकरी सामोरे जात आहे परंतु सरकार याकडे लक्ष देत नाही.

दूध उत्पादन हा एकमेव असा धंदा आहे जो शेतकऱ्याला दहा दिवसाला नगदी पैसे देणारा आहे. पण दुधाचे भाव पडल्यामुळे हा धंदा सुद्धा नुकसानीत आलेला आहे आमची सरकार कडे मागणी आहे कि मागच्या सरकारने ज्याप्रकारे प्रतिलिटर ५ रुपये अनुदान दिले होते तसेच ह्या सरकारने दुधाला प्रतिलिटर १० रुपये अनुदान थेट शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करावे. लॉकडाउनमुळे दुधाला मागणी नाहीये. त्यामुळे अतिरिक्त दूध आहे त्याची पावडर तयार करून निर्यातीला प्रति किलो पन्नास रुपये अनुदान द्यावे आणि प्रमुख मागणी आहे की, दुधाला किमान आधारभूत किंमत सरकारने जाहीर करावी. यामुळे शेतकऱ्यांचे नुकसान होणार नाही.

यावेळी शिवा पाटील (युवा नेते,भाजपा), शिवाजी गायकवाड, साहेबराव चट्टे (युवा तालुका अध्यक्ष, रयत क्रांती),केशव पवार, उमाकांत ताकबीडकर, भुजग भाकरे, जयराज शिंदे, सुरेश महाराज, जगदीश जाधव ,व्यंकट शिंदे व अनेक शेतकरी उपस्थित होते.

रयत क्रांती संघटनेच्या वतीने नांदेड जिल्ह्यातील सोमठाणा, मुगाव, मांजरम, येथे दूध संकलन केंद्र बंद करून आंदोलन करण्यात आले आहे.