…म्हणून कंगना प्रकरणाला हवा दिली जातेय : राष्ट्रवादीचे खा. अमोल कोल्हे

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – देशाच्या कोलमडलेल्या अर्थव्यवस्थेवरून लक्ष वळवण्यासाठीच कंगना प्रकरणाला हवा दिली जात आहे असा आरोप राष्ट्रवादीचे खासदार अमोल कोल्हे यांनी केला आहे. कलाकारांनी सामाजिक भान जपलं पाहिजे असा सल्लाही त्यांनी यावेळी दिला आहे. एका वृत्तवाहिनीसोबत ते बोलत होते.

अमोल कोल्हे म्हणाले की, “देशातील कोलमडलेल्या अर्थव्यवस्थेवरून लक्ष वळवण्यासाठीच कंगना प्रकरणाला हवा दिली जात आहे. त्याचा बोलविता धनी कोण आहे हे सर्वांना माहितच आहे. एखाद्या व्यक्तीला किती महत्त्व द्यायचं हे ठरवलं पाहिजे. कलाकारांनी देखील कोणत्याही गोष्टीवर भाष्य करताना सामाजिक भान जपलं पाहिजे. देशात रोज हजारो केसेस सापडत आहेत (कोरोना) याचंही भान राखलं पाहिजे” असंही ते म्हणाले.

काँग्रेस नेते संजय निरुपम यांनी मात्र शिवसेनेवर हल्ला चढवला आहे. कंगनानं मुंबईबाबत जे वक्तव्य केलं त्यावर मी सहमत नाही. परंतु शिवसेनेनं कामधंदा सोडून तिच्याविरोधात मोहिम उघडली आहे. शिवसेनेची ही कृती चुकीची आहे. कंगनाच्या कार्यालयात घुसून तोडफोड करण्याची गरज नव्हती. कोर्टानंही या तोडकामाला स्थगिती देत ही कारवाई चुकीची असल्याचं म्हटलं आहे. त्यामुळं शिवसेना एका महिलेला सूड भावनेतून त्रास देत आहे हे उघड झालं आहे” असा दावाही निरुपम यांनी केला आहे.