Video : ‘आपल्या प्रार्थनेमुळे, मी मरता मरता वाचले’, खा. नवनीत राणांची भावूक पोस्ट

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन –  अमरावतीच्या खासदार नवनीत कौर राणा यांच्या प्रकृतीत थोडी सुधारणार झाल्याने त्यांना आज आयसीयूमधून सामान्य कक्षात हलवण्यात आले आहे. नवनीत राणा यांना कोरोनाचा संसर्ग झाल्यानंतर त्यांची प्रकृती बिघडल्याने त्यांना तातडीने मुंबईतील लीलावती रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. प्रकृती खालावल्याने त्यांना नागपूरहून मुंबईला हलवण्यात आले होते.

काही दिवसांपूर्वी नवनीत राणा यांना कोरोनाची लागण झाल्याचे निदान झाले होते. यानंतर त्यांना अमरावती येथील रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. मात्र, तेथे सहा दिवस उपचार करुनही काहीच फरक पडला नाही. उलट त्यांची प्रकृती अधिकच बिघडल्याने त्यांना तातडीने नागपूरला वोक्हार्ट रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. या ठिकाणी दाखल केल्यानंतर त्यांची प्रकृती अधिकच खालावल्याने त्यांनी मुंबईतील लीलावती रुग्णालयात हलवण्यात आले.

दरम्यान, नवनीत राणा यांच्यावर लीलावती रुग्णालयात उपचार सुरु आहेत. आता त्यांची प्रकृती स्थिर असल्याने त्यांना आयसीयूमधून सामान्य कक्षात हलवण्यात आले आहे. याबाबत स्वत: नवनीत राणा यांनी फेसबुक पोस्ट करून माहिती दिली आहे. आज मला आयसीयूमधून सामान्य कक्षात स्थलांतर करण्यात आले आहे. आता माझी प्रकृती थोडी स्थिर आहे, आपण सर्वांचा आशीर्वाद माझ्या सोबत आहेत. मी लवकर बरी होऊन जनसेवेत पुन्हा सज्ज होणार असल्याचे राणा यांनी म्हटले आहे.