खासदार प्रज्ञा ठाकूर रुग्णालयात ‘भरती’, भोपाळमध्ये ‘झळकले’ होते गायबचे ‘पोस्टर्स’

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – जगभरात कोरोनामुळे धुमाकूळ घातला असताना, भारतात देखील कोरोनाचा प्रादुर्भाव झाला आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव कमी करण्यासाठी चार टप्प्यात लॉकडाऊन करण्यात आले. आत, लवकरच लॉकडाऊनचा पाचवा टप्पा सुरु करण्यात येईल, असे दिसून येत आहे. महाराष्ट्रात कोरोनाबाधितांची संख्या मोठ्या प्रमाणात असून महाराष्ट्रात लॉकडाऊन आणखी वाढण्याची शक्यता असल्याचे समजतेय. कोरोना प्रादुर्भाव रोखण्यासाठी नेते मंडळी काळजी घेत आहे. मात्र, काही नेत्यांनाही कोरोनाने ग्रसले आहे. आता भाजप खासदार साध्वी प्रज्ञा ठाकूर यांना दिल्लीतील एम्स रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. भोपाळ मतदारसंघातील खासदार आणि भाजप नेत्या प्रज्ञा ठाकूर यांना दिल्लीतील एम्स रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

देशात लॉकडाऊन असल्यामुळे त्या दिल्लीत अडकून पडल्या आहेत. मात्र, भोपाळ मतदारसंघात त्यांचे पोस्टर्स झळकत आहेत. खासदार गायब अशा आशयाचे त्यांचे पोस्टर्स त्यांच्या मतदारसंघात झळकत असल्याचे पहायला मिळले. त्यानंतर दुसऱ्या दिवशीच त्यांना एम्स रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. आरोग्य अत्यावस्थेमुळे गेल्या अनेक दिवसांपासून त्या दिल्लीतच रहात आहेत. मात्र, भोपाळमध्ये त्या गायब असल्याचे पोस्टर्स झळकले. यानंतर त्यांनी व्हिडिओच्या माध्यमातून रुग्णालयात दाखल असून प्रकृती उत्तम नसल्याचे म्हटले आहे.

एका डोळ्याने दिसत नसून दुसऱ्या डोळ्याने अंधुकपणे दिसत असल्याचे प्रज्ञा ठाकूर यांनी म्हटलेय. प्रज्ञासिंग यांच्या मेंदूपासून पायापर्यंत शरीरावर सूज असून डॉक्टरांनी त्यांना कुणाशीही बोलण्यास मनाई केली आहे. लॉकडाऊन काळात मी दिल्लीत आहे, पण मतदारसंघात माझ्या टीमचं काम सुरुच आहे. तरीही, काँग्रेस नेत्यांकडून जाणीवपूर्वक पोस्टरबाजी करण्यात आल्याचा आरोप ठाकूर यांनी केला आहे. मी ज्या शारिरीक व्याधीने आजारी आहे, ती काँग्रेसच्या कार्यकाळात सरकारकडून देण्यात आल्याचंही त्यांनी म्हटलं.