खा. सुळेंंनी मतदार संघातील देवस्थानच्या पदाधिकाऱ्यांशी साधला संवाद

नीरा : पोलीसनामा ऑनलाइन – कोरोना विषाणू आणि त्यामुळे निर्माण झालेल्या परिस्थितीत बारामती लोकसभा मतदार संघातील देवस्थान संस्था आपापल्या पातळीवर समाजोपयोगी उपक्रम राबवित आहेत. संकटसमयी प्रशासनाच्या खांद्याला खांदा लावून काम करणाऱ्या या देवस्थानच्या पदाधिकाऱ्यांशी खासदार सुप्रिया सुळे यांनी व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे संवाद साधला.

कोरोना विषाणूमुळे निर्माण झालेल्या परिस्थितीत या देवस्थान संस्था राबवित असलेल्या विविध उपक्रमांची माहिती घेतली. या कठीण काळात त्यांच्याकडून विविध समाजोपयोगी उपक्रम राबविण्यात येत आहेत. अशा प्रसंगी त्यांचे आभार मानणे, ते करत असलेल्या कामाबद्दल जनतेच्या वतीने कृतज्ञता व्यक्त करणे आणि त्याचबरोबर त्यांच्या स्वतःच्याही काही अडचणी असतील, काम करताना काही प्रश्न निर्माण होत असतील, तर ते जाणून घेऊन काही मदत करता येईल का, प्रश्न सोडवता येतील का, प्रशासनाशी समन्वय साधून जनतेच्या कल्याणासाठी आणखी काही उपक्रम राबविता येतील का याचा आढावा या ऑनलाईन बैठकीत घेण्यात आला.

या व्हिडिओ कॉन्फरन्समध्ये बारामती तालुक्यातील मोरगाव, सोमेश्वर, ख्वाजा शाहमन्सूर दर्गा, सुपा, इंदापूर तालुक्यातील नीरा नरसिंगपूर देवस्थान ट्रस्ट, पुरंदर तालुक्यातील जेजुरी, नारायणपूर, भुलेश्वर, सिद्धेश्वर, खडकवासला विधानसभा मतदार संघातील खेड शिवापूर येथील कमर अली दरवेश ट्रस्ट, भोर तालुक्यातील बनेश्वर देवस्थान ट्रस्ट, वेल्हा तालुक्यातील मेंगाई देवी आणि मुळशी तालुक्यातील खारवडे म्हसोबा देवस्थान ट्रस्टच्या पदाधिकारी आणि प्रतिनिधींनी सहभाग घेतला. मतदारसंघातील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या तालुकाध्यक्षही यामध्ये सहभागी झाले होते.

काही ट्रस्ट अतिशय चांगल्या प्रकारे गोशाळा चालवत आहेत, याबद्दल त्यांचे आभार मानले. सध्याच्या परिस्थितीत जनावरांच्या चाऱ्याचा प्रश्न निर्माण होऊ शकतो. त्याबाबत पुरेशी उपाययोजना करण्याचा प्रयत्न करीत आहोत, अशी माहिती यावेळी काही ट्रस्टच्या पदाधिकाऱ्यांनी दिली. कोरोनाच्या काळात देवस्थान ट्रस्टना येणाऱ्या अडचणींवर चर्चा केली. त्यांच्या पाठीशी ठामपणे उभा राहण्याचा प्रयत्न करण्याची ग्वाही यावेळी दिली. सध्या रमजानचे रोजे सुरु आहेत. या पार्श्वभूमीवर खेड शिवापूर येथील कमरअली दुर्वेश दर्ग्याच्या प्रतिनिधींशी सुद्धा सुळे यांनी संवाद साधला.