मुफ्ती,अब्दुल्ला कुटुंबांनी काश्मीरच्या तीन पिढ्या उद्ध्वस्त केल्या

श्रीनगर : वृत्तसंस्था – कलम ३७० रद्द केले तर जम्मू-काश्मीर भारतापासून वेगळा होईल अशी धमकी देणाऱ्या मेहबुबा मुफ्ती व फारुख अब्दुल्लांवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी निशाणा साधला आहे. अब्दुल्ला आणि मुफ्ती दोघांनी जम्मू-काश्मीरच्या तीन पिढया उद्धवस्त केल्या. मी अब्दुल्ला आणि मुफ्ती यांना देशाचे विभाजन करु देणार नाही असे वक्तव्य मोदी यांनी केले आहे. लोकसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर जम्मू-काश्मीरमध्ये पहिली प्रचारसभा घेतली. त्यावेळी ते बोलत होते.

काँग्रेस, पीडीपी आणि नॅशनल कॉन्फरन्सच्या नेत्यांवर टीका करताना मोदी म्हणाले की, ‘अब्दुल्ला, मुफ्ती कुटुंबीयांनी जम्मू कश्मीरच्या तीन पिढ्यांचे आयुष्य बर्बाद केले आहे. त्यामुळे आता कश्मीरच्या उज्ज्वल भविष्यासाठी या दोन कुटुंबांना इथून बाहेर काढायला हवा. ते मोदींविरोधात लढण्यासाठी त्यांच्या संपूर्ण टीमला आणतील. मोदींची हवी तितकी बदनामी करतील. मात्र मी त्यांना देशाचे विभाजन करु देणार नाही.’

काँग्रेसवर टीका करताना मोदी म्हणाले की, ‘काँग्रेसच्या धोरणांमुळेच काश्मिरी पंडितांना खोऱ्यातील स्वत:चे राहते घर सोडून बाहेर पडावे लागले.काँग्रेस आणि त्यांच्या मित्रांना व्होट बँकेची इतकी चिंता होती की, त्यांनी काश्मिरी पंडितांवर होणाऱ्या अत्याचारांकडे दुर्लक्ष केले.’ काश्मिरी पंडितांना खोऱ्यामध्ये त्यांची भूमी परत मिळवून देण्यासाठी त्यांना वसवण्यासाठी भाजपा कटिबद्ध असल्याचे आश्वासनही मोदींनी यावेळी दिले.

तसेच संरक्षणविषयक करार काँग्रेससाठी फक्त पैसा कमवण्याचा मार्ग आहेत. काँग्रेसला देशाच्या सुरक्षेशी काही घेण-देणं नव्हतं. भारतीय सैन्य त्यांच्यासाठी पैसे कमवण्याचा एक मार्ग होता. सुरक्षा करारांमधून फक्त पैसे लाटण्याचे काम त्यांनी केलं असेही मोदी म्हणाले.