मुंबईमधील लोकलमध्ये आता इंटरनेटविना मनोरंजन !

मुंबई : पोलिसनामा ऑनलाईन – अनेकवेळा रेल्वेमध्ये प्रवाशांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागतो. त्यामुळे आता मोबाईलला रेंज नसणे तसेच रेल्वेच्या अनेक अडचणींपासून आता प्रवाशांची सुटका होणार आहे. यासाठी आता मध्य रेल्वेने  ‘कंटेट ऑफ डिमांड’ अंतर्गत  वायफाय बसवण्याचा निर्णय घेतला असून यामुळे प्रवाशांना विना इंटरनेट मनोरंजन करता येणार आहे.

मध्य रेल्वेने 165 लोकलमध्ये वायफाय बसवण्याचा निर्णय घेतला असून यामध्ये विविध प्रकारचे मनोरंजनपर कार्यक्रम प्रवाशांना पाहता येणार आहेत. यामध्ये चित्रपट, मालिका आणि गाणी प्रीलोडेड असणार आहेत. रेल्वेमध्ये चढल्यावर तुम्हाला केवळ  वायफाय सुरु करायचे आहे. त्यानंतर तुमच्या मोबाईलवर  लॉगइन केल्यानंतर हे थेट तुम्हाला पाहायला मिळणार आहेत.

यासाठी लोकलमध्ये  वायफाय बसवण्याचे काम सुरु असल्याचे सांगण्यात आले असून दिवाळीच्या मुहूर्तावर प्रवाशांना याचा लाभ घेता येणार आहे. यासाठी रेल्वेने एका खासगी कंपनीबरोबर करार केला असून यामुळे रेल्वेलादेखील मोठ्या प्रमाणात फायदा होणार आहे. या सुविधेमुळे रेल्वेमध्ये काही बिघाड झाल्यास या सेवेने प्रवाशांना मनोरंजन मिळेल, असा विश्वास रेल्वेच्या अधिकाऱ्यांनी व्यक्त केला आहे.

प्रादेशिक भाषेत देखील मनोरंजन

या  वायफाय सेवेमध्ये पाहायला मिळणारे सर्व कार्यक्रम हे केवळ इंग्रजी भाषेत न दाखवता प्रादेशिक भाषेत देखील पाहायला मिळणार आहेत. यामध्ये हिंदी आणि मराठी भाषेचा देखील समावेश असणार असून ठराविक कालावधीनंतर यातील कंटेट अपडेट केला जणार आहे.

एसटीचे ‘प्री-लोडेड’ वायफाय बंद
काही महिन्यांपूर्वी एसटी महामंडळाने देखील गाड्यांमध्ये वायफाय बसविले होते. मात्र काही महिने सर्व सुरळीत चालल्यानंतर हे वायफाय बंद करण्यात आले. त्यामुळे आता गाड्यांमधील वायफाय हे केवळ शोभेच्या वस्तू झाल्या आहेत.

Visit : Policenama.com