‘या’ विभागातील 300 कर्मचारी आणि अधिकारी अ‍ॅन्टी करप्शनच्या ‘रडार’वर

नवी मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – राज्यात सत्ता स्थापनेसाठी शिवसेना विरोधकांना सोबत घेण्याचा प्रयत्न करत आहे यामुळे या स्थितीत प्राप्तीकर विभागाने बृहन्मुंबई महापालिकेतील कंत्राटदारांना टार्गेट केले आहे. महानगरपालिकेतील अधिकाऱ्यांची बदली केलेली असूनही ते आपली पदे सोडण्यास तयार नसल्याने आता लाचलुचपत खात्याकडून अशा सर्व अधिकाऱ्यांवर कारवाई केली जाणार आहे. महापालिकेच्या कामगार संघटनेने लाचलुचपत विभागाकडे याबाबत तक्रार केली आहे.यासंदर्भात एसीबीने 300 कर्मचाऱ्यांची चौकशीसाठी महापालिकेकडे यादी देखील मागितली आहे. यामध्ये एसीबीकडून सर्व कर्मचाऱ्यांच्या मालमत्तेची देखील चौकशी केली जाणार असल्याचे बोलले जात आहे. सर्वच महत्वाचे अधिकारी सध्या एसीबीच्या रडावर असल्यामुळे अधिकारी वर्गाची मोठी धांदल उडाल्याचे समजते.

महापालिकेच्या कंत्राटदारांवर छापे
केंद्र सरकारच्या नियंत्रणात असलेल्या प्राप्तिकर विभागाने गेल्या आठवड्यात शिवसेनेकडे असलेल्या महानगपालिकेतील कंत्राटदारांवर छापे टाकले होते. यामध्ये एकूण 37 मोठ्या कंत्राटदारांचा समावेश आहे. यामुळे आता यातील मोठ्या नेत्यांची चौकशी होणार आहे. तसेच येत्या काळात महानगरपालिकेशी संबंधित असलेल्या शिवसेनेच्या बड्या नेत्यांची देखील चौकशी केली जाऊ शकते.

मागील आठवड्यात प्राप्तिकर विभागाकडून केलेल्या कारवाईत कंत्राटदारांकडून तब्बल 735 कोटी रुपयांची बेहिशेबी मालमत्ता जप्त करण्यात आल्याची माहिती आहे. तसेच अनेक कंत्राटदारांकडून एकमेकांकडून कर्जाच्या स्वरूपात घेतलेल्या रकमेबाबत गडबड निर्माण झाल्याची माहिती विभागाला मिळाली असल्याने विभागाकडून कारवाई करण्यात आल्याचे समजते.

Visit :  Policenama.com