SSR Case : ‘सत्य’ लपवण्यासाठी बिहार आणि महाराष्ट्रातील नेत्यांची हातमिळवणी, संजय राऊतांचा गंभीर आरोप

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – अभिनेता सुशांत सिंह राजपूत याच्या निधनाला आता एक महिन्यापेक्षा जास्त कालावधी होऊन गेला आहे. आता या प्रकरणाचा तपास सीबीआय करत आहे. सीबीआयने या प्रकरणात गुन्हे देखील दाखल केले आहेत. मात्र, या प्रकरणावरून राजकारण तापू लागले आहे. राजकीय हस्तक्षेपामुळे या प्रकरणाने वेगळे वळण घेतले आहे. यामध्ये आता शिवसेनेचे नेते आणि खासदार संजय राऊत यांनी उडी घेतली आहे. संजय राऊत यांनी या प्रकरणावरून विरोधी पक्षावर घणाघाती आरोप केले आहेत.

सिशांत सिंह प्रकरणाच्या तळापर्यंत मुंबई पोलीस जाऊ नये, या प्रकरणाची पाळंमुळं खणून मुंबई पोलिसांनी सत्य बाहेर काढू नये म्हणून महाराष्ट्रातील विरोधी पक्षाचे नेते आणि बिहारमधील नेत्यांची हातमिळवणी झाली आहे, असा गंभीर आरोप शिवसेनेचे नेते आणि खासदार संजय राऊत यांनी केला आहे. प्रसारमाध्यमाशी बोलताना संजय राऊत यांनी हा आरोप केला आहे.

संजय राऊत म्हणाले, मुंबई पोलीस हे जगातील सर्वोत्तम पोलीस आहेत. मुंबई पोलिसांनी अनेक गंभीर प्रकरणे बाहेर काढली आहेत. अनेक प्रकरणात मुंबई पोलिसांनीच तपास करण्याचे निर्देश सर्वोच्च न्यायालयानेही दिले आहेत. त्यामुळे या प्रकरणात ज्यांचा मुंबई पोलिसांवर विश्वास नाही त्यांच्या हेतूवरच शंका आहे. त्यांना काही तरी लपवायचे आहे. पोलिसांनी सत्यापर्यंत जाऊ नये, सत्य शोधू नये यासाठी त्यांचा खटाटोप सुरु असल्याचे सांगत, सुशांत सिंह प्रकरणाचं सत्य दडवण्यासाठी बिहारचे नेते आणि महाराष्ट्रातील विरोधकांची हातमिळवणी झाली आहे.. हा महाराष्ट्रविरोधी कट असल्याचा गंभीर आरोप संजय राऊत यांनी केला आहे.

हे महाराष्ट्र विरोधी षयडंत्र
सुशांतच्या प्रकरणाचा राजकीय फायद्यातोट्यासाठी वापर केला जात आहे. हे घृणास्पद आहे. पोलिसांना आधी तपास पूर्ण करु द्यावा. त्यानंतर टीका करावी. तपास करण्याच्या आधीच बोंबा मारु नये, असे सांगत या प्रकरणात 40 दिवसांनी एफआयआर दाखल केला जातो. 40 दिवसानंतर त्याच्या कुटुंबीयांना धक्का बसतो. बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार या प्रकरणावर प्रतिक्रिया देतात. विधानसभेत ते ठराव करुन प्रकरण सीबीआयकडे देण्याचा निर्णय घेतात. केंद्राकडे सीबीआयचा तगादा लावला जातो. महाराष्ट्राला विश्वासात न घेता सीबीआय चौकशीचं नोटिफिकेशन काढलं जातं. हा घटनाक्रम एकदा समजून घ्या. सर्व समजून येईल. या सर्व प्रकरणाची कुणीतरी बसून पटकथा लिहिली आहे. त्यानुसार घटना घडत आहेत. काही लोक पडद्यामागून हालचाली करत आहेत. सत्यबाहेर येऊ नये यासाठी हे महाराष्ट्राविरोधी षडयंत्र असल्याचे राऊत म्हणाले.

पोलीसनामा न्युज आता टेलीग्रामवर... आमचं चॅनेल (@policenamanews) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा. WhatsAPP

You might also like