बंदोबस्त, नाकाबंदीमुळे वैतागलेल्या मुंबई पोलिसांवर आता या ‘नव्या’ कामाचा बोजा

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – कोरोना विषाणूच्या प्रादुर्भावामुळे पोलीस दल रात्रंदिवस तैनात आहेत. पोलीस दलातील अनेक पोलिसांना कोरोनाची बाधा झाली असून काही जणांचा यामुळे मृत्यू झाला आहे. सततच्या ड्युटीमुळे मुंबई पोलीस दलातील पोलीस वैतागले असतानाच यात भर म्हणून त्यांना आता आणखी एका नवीन कामाची जबाबदारी देण्यात आली आहे. रेशन कार्ड नसलेल्या परप्रांतीयांची यादी तयार करण्याची नोटिस मुंबई जिल्हा उपनगर कार्यालयातून पोलीस विभागाला आली आहे.

कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव आणि अधिच अपुऱ्या मनुष्यबलामुळे वाढत्या कामाचा बोजा यामुळे मुंबई पोलीस मेटाकुटीला आलेला आहे. यातच परिमंडळ 11 येथे ही नोटिस आल्यानंतर पोलीस कर्मचाऱ्यांमध्ये संतापाची लाट उसळली आहे. मुंबईच्या गुन्हेगारांचा मागोवा, त्यांच्या न्यायालयीन प्रक्रियेची जबाबदारी, कायदा आणि सुव्यवस्था अबाधित ठेवण्याची जबाबदारी, त्यानंतर महाराष्ट्रातील परप्रांतीयांना त्यांच्या मूळगावी पाठवण्यासाठीची त्यांची व्यवस्था करणे अशी कामे मुंबई पोलीस करत आहेत. असे असताना कामाचा अतिरिक्त बोजा पोलीस कर्मचाऱ्यावर पडत आहे. त्यातच परप्रांतीयांना थांबवून त्यांच्या खाण्यापिण्याची व्यवस्था त्यांची यादी, त्याची वर्गवारी पर्यंतच्या कामाला पोलिसांना जुंपण्यात आले आहे.

एवढी जबाबदारी असताना आता ज्यांच्याकडे शिधापत्रिका नाही अशा मुंबईत राहणाऱ्या परप्रांतियांची यादी तयार करण्याची नोटिस मुंबई जिल्हा उपनगर कार्यालयातून पोलिसांना पाठविण्यात आली आहे. त्यामुळे पोलीस दलात संतापाची लाट उसळली आहे. परप्रांतियांची यादी तयार केल्यानंतर सरकारकडून दिले जाणारे 5 किलो तांदूळ हे परप्रांतियांना पोहचविणे सोपे होणार आहे. सध्या अनेक पोलीस कर्मचाऱ्यांना कोरोनाची बाधा झाली आहे. तसेच अनेक पोलीस क्वारंटाईनमध्ये आहेत. त्यामुळे पोलीस ठाण्यात पोलीस कर्मचाऱ्यांचे संख्याबळ कमी झाले आहे.

पोलीस कर्मचाऱ्यांमध्य संताप
मागील अडीच महिन्यापासून राज्यात लॉकडाऊन असून या काळात पोलीस रस्त्यावर बंदोबस्त, नाकाबंदी, गस्त घालत आहे. यामुळे पोलीस वैतागले आहेत. कायदा व सुव्यवस्थेसोबतच गुन्हेगारांवर अंकुश ठेवण्याचे काम, बंदोबस्त, नाकाबंदी, गस्त, प्रप्रांतीयांना आवरणे, त्यांची कागदपत्रे स्वीकारणे, त्यांची जिल्हा निहाय वर्गवारी करणे, त्यानंतर त्यांना गाडीतून गावी रवाना अशी कामे पेलीस करत आहेत. त्यानंतर आता शिधापत्रिका नसलेल्यांची यादी तयार करण्याची नोटिस आल्याने पोलीस कर्मचाऱ्यांनी संताप व्यक्त केला आहे.