सांगलीत महापालिका प्रशासन अन् नगरसेवकाकडून सोशल डिस्टन्सिंगची ‘ऐसीतैशी’

सांगली : पोलीसनामा ऑनलाइन – सांगली जिल्ह्यात आतापर्यंत 25 जणांना कोरोना व्हायरसची लागण झाली आहे. त्यामुळे प्रशासनाकडून संचारबंदीची कडक अमलबजावणी केली जात आहे. जिल्हाधिकारी डॉ. अभिजित चौधरी, पोलिस अधीक्षक सुहेल शर्मा रात्रंदिवस कार्यरत आहेत. मात्र महापालिका प्रशासनाकडूनच नियमांचे उल्लंघन होताना दिसत आहे. यामध्ये नगरसेवकही सहभागी होत आहेत. मनपा आयुक्त आणि नगरसेवकांकडून सोशल डिस्टनसिंगची ऐसीतैशी केली जात आहे.

जिल्ह्यात कोरोना बाधित 25 रुग्ण आढळले आहेत. काही जणांचे अहवाल येणे बाकी आहे. मोठया प्रमाणात रुग्ण आढळल्याने प्रशासनाने संचारबंदी कडक केली आहे. जिल्हाधिकारी डॉ. चौधरी पूर्ण परिस्थितीवर लक्ष ठेवून आहेत. तर पोलिस अधीक्षक शर्मा यांनी विनाकारण फिरणाऱ्या वाहनधारकांवर कारवाईचा बडगा उगारला आहे. आतापर्यंत 2500 वाहने जप्त करण्यात आली आहेत. पोलिस रात्रंदिवस रस्त्यावर उभे आहेत.

जिल्ह्यात सर्व प्रशासन नियमांची कडक अमलबजावणी करत आहे. मात्र महापालिकेचे आयुक्त नितीन कापडणीस, नगरसेवक मंगेश चव्हाण, फिरोज पठाण यांच्यासह पालिकेचे अधिकारी, कर्मचारी गुरुवारी सोशल डिस्टनस न ठेवता अग्निशमन दलाच्या गाडीतून औषध फवारणी करताना दिसून आले. याचे फोटोही सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. दरम्यान मनपा आयुक्त, नगरसेवक यांच्याकडूनच नियमांचे उल्लंघन केले जात आहे. त्यामुळे त्यांच्यावर टीका केली जात असून नियम फक्त सामान्य नागरिकांना लागू आहेत का असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.