धक्कादायक ! खुनानंतर एक दिवस मृतदेह घरातच ठेवला

'ऑनर किलिंग'च्या तपासातून धक्कादायक बाब उघडकीस

अहमदनगर : पोलीसनामा ऑनलाईन – जामखेड तालुक्यातील ‘ऑनर किलिंग’नंतर मुलीचा मृतदेह पित्याने गोणीत भरून एक दिवस घरात ठेवला होता. त्यानंतर दुसऱ्या दिवशी मुलीच्या मामांच्या मदतीने प्रेताची विल्हेवाट लावल्याची धक्कादायक बाब पोलीस तपासातून स्पष्ट झाली आहे.

जामखेड तालुक्यात झालेल्या या घटनेमुळे राज्यभरात खळबळ उडाली आहे. क्रौर्याची परिसीमा असलेल्या सदर घटनेतील आरोपींना कठोर शिक्षा करावी, अशी मागणी विविध स्तरातून होऊ लागली आहे. मात्र लोकसभेच्या निवडणुकीच्या प्रचारात दंग असलेल्या राजकीय नेत्यांना या घटनेचा निषेध करायलाही वेळ मिळाला नाही. तसेच कुठल्याही सामाजिक संघटनेला याबाबत आवाज उठवायला वेळ मिळाला नाही.

‘…तर तुचीही हिच गत करू’

जामखेड शहरातील तरुणासोबत भ्रमणध्वनीवरून बोलत असलेल्या सतरा वर्षाच्या मुलीचा खून केल्यानंतर वडिलांनी तिचा मृतदेह घरातच गोणीत भरून ठेवला. हा प्रकार आरोपी पांडुरंग सायगुडे यांची पत्नी व लहान मुलीला समजल्यानंतर त्यांनाही दमदाटी केली. हा प्रकार जर कुणाला सांगितला, तर तुमचीही तिच्यासारखीच अव्यवस्था करेल, अशी धमकी दिली. त्या भीतीपोटी घरातील सदस्य गप्प बसले. एक दिवस मृतदेह घरात असतानाही शेजारी राहणाऱ्या भावालाही याची कल्पना येऊ दिली नाही.

मृतदेहाची विल्हेवाट लावून अपहरणाची फिर्याद

सदर घटनेनंतर मुलीच्या मामांना भ्रमणध्वनीवरून संपर्क करून बोलावून घेतले. त्यानंतर त्यांच्या मदतीने दुसऱ्या दिवशी घरापासून काही अंतरावर मृतदेह टाकून दिला. त्यानंतर कर्जत पोलीस ठाण्यात अल्पवयीन मुलीचे अपहरण केल्याची फिर्याद नोंदविली.

…या प्रश्नामुळे झाला उलगडा

मुलीचे अपहरण झाले किंवा ती गायब झाली असली, तरी तिच्या चपला घरातच होत्या. अपहरण झालेल्या मुलीच्या चपला घरातच कशा ? तिचा मृतदेह घरापासून जवळच का सापडला ? मयत मुलीच्या जवळच्या नातेवाईकांनाही ती गायब असल्याची माहिती कशी नाही ? त्यामुळे सुरुवातीपासूनच पोलिसांना या घटनेबाबत संशय वाटत होता. तांत्रिक तपास व मयत मुलीच्या नातेवाईकांच्या उत्तरातील विसंगती आदींमुळे गुन्ह्याचा उलगडा झाला. पिता व दोन सख्ख्या मामांना अटक करण्यात जामखेड पोलीस व स्थानिक गुन्हे शाखेला यश आले आहे.

विविध स्तरातून निषेध

अतिशय संतापजनक असलेल्या या घटनेचा विविध स्तरातून तीव्र निषेध होऊ लागला आहे. गुन्ह्याचा तपास लवकर करून आरोपींना लवकरात लवकर शिक्षा व्हावी, अशी मागणी होऊ लागली आहे.