धक्कादायक ! पुण्यात अडीच हजार रूपयासाठी मित्राचा खून

पिंपरी : पोलिसनामा ऑनलाईन – अडीच हजार रुपये देण्या-घेण्यावरून झालेल्या वादातून मित्राने मित्रावर हत्याराने वार करून, मृतदेह जाळून खून केल्याचा प्रकार पिंपरी पोलिसानी उघडकीस आला. पिंपरीतील एचए मैदानावर हा प्रकार झाला होता. आरोपीला अटक केली आहे.

आकाश दिनकर राऊत (२३ रा. गांधीनगर, पिंपरी) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे. तर, अजय राजेश नागोसे (१९, रा.पिंपरी) असे खून झालेल्या तरुणाचे नाव आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अजय याचा डोक्यात दगड घालून खून करून मृतदेह जाळून टाकण्यात आला होता. मृतदेहाजवळ मिळालेल्या मोबाईलवरून त्याची ओळख पटली. दरम्यान, सीसीटीव्ही तपासले असता आकाश हा घटनेच्या वेळी अजयसोबत असल्याचे समोर आले. तसेच घटनेनंतर तो फरार होता.

अधिक तपास केला असता आकाश बीड येथे असल्याची माहिती मिळाली. त्यावरून त्याला बीडमधून ताब्यात घेतले. पोलिसांनी कसून चौकशी केली असता अडीच हजार रुपये देण्या घेण्यावरून दोघांमध्ये वाद झाला होता. यातून चिडून त्याने अजयचा खून केला.

हा तपास पोलीस निरीक्षक कल्याण पवार, रंगनाथ उंडे, सहायक पोलीस निरीक्षक अन्सार शेख आणि त्यांच्या पथकाने केला.