सांगोल्यात मोबाईलच्या वादातून मित्रानेच केला मित्राचा खून

पोलिसनामा ऑनलाईन – मोबाईलवरून दोन मित्रांमध्ये वाद झाल्यानंतर एकाने झोपलेल्या मित्राचा दगडाने डोके ठेचून खून केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. विशेष म्हणजे मारेकरी स्वतःहून पोलिसांत हजर झाला. हा धक्कादायक प्रकार सांगोला येथे कृषि उत्पन्न बाजार समितीच्या आवारात आज सकाळी सहा वाजेच्या सुमारास उघडकीस आला.

आण्णा मोहन साखरे (वय 35) असे खून झालेल्याचे नाव आहे. यासंदर्भात किरण कोळी याने स्वतःहून सांगोला पोलीस ठाण्यात हजर होऊन मित्राचा खून केल्याची कबुली दिली. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आण्णा साखरे आणि किरण कोळी हे दोघे मित्र सांगोला कृषि उत्पन्न बाजार समितीच्या आवारात दररोज मोलमजुरी करत होते. काल रात्री दोघांनी मद्यप्राशन केले. त्यावेळी आण्णा साखरेने किरणचा मोबाईल घेतला. त्यानंतर किरणने मोबाईल परत मागितला असता त्याने पाचशे रूपयांची मागणी केली. रक्कम दे, नाहीतर काय करायचे ते कर असे त्याने सुनावले. त्यावरून झालेला वाद नंतर मिटला आणि दोघेही बाजार समितीच्या आवारात झोपी गेले. मात्र पहाटे आण्णा साखरे झोपेत असताना वादाचा राग मनात धरुन किरणाने दगडाने त्याचे डोके ठेचून खून केला. या घटनेनंतर किरण स्वतःहून सांगोला पोलीस ठाण्यात हजर झाला. त्याने दिलेली माहिती ऐकून पोलिसांनाही धक्का बसला. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली असता तेथे आण्णा साखरे रक्ताच्या थारोळ्यात पडला होता. त्याला रूग्णालयात दाखल केले असता डॉक्टरांनी त्याचा मृत्यू झाल्याचे घोषित केले.