धक्कादायक ! IPL सट्टेबाजीला विरोध केल्यानं विष पाजून आई अन् बहिणीला संपवलं

हैदराबाद : पोलीसनामा ऑनलाइन –  सट्टेबाजीमध्ये घरात असलेली सर्व पुंजी गमावल्याने आई व बहिणीने त्याच्या सट्टेबाजीला विरोध केला. त्या रागातून त्याने आपल्या आई व बहिणीला जेवणातून विष पाजून त्यांची हत्या (murder)केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे.

साईनाथ रेड्डी असे या मुलाचे नाव असून, पोलिसांनी त्याला अटक केली आहे. आई सुनीता आणि बहीणअनुषा यांचा मृत्यू झाला आहे.

मेधाचल जिल्ह्यातील रावळकोल येथे राहणारे प्रभाकर रेड्डी यांचा तीन वर्षांपूर्वी रस्ते अपघातात मृत्यू झाला. त्यांच्या निधनानंतर विम्याची रक्कम व जमीन विक्रीतून मिळालेले पैसे असे २० लाख रुपये बँकेत ठेवण्यात आले होते. सुनीता एका खासगी कंपनीत नोकरी करत होत्या, तर अनुषा बी़ फार्मचे शिक्षण घेत होती. साईनाथ रेड्डी हा एम टेक शिकत असून, नोकरीही करतो.

साईनाथ याला सट्टेबाजीचे व्यसन लागले. आयपीएलच्या या सीजनमध्ये त्याने सट्टेबाजीवर मोठा पैसा लावला होता. मात्र, सट्टेबाजीमध्ये तो हरला. त्याला त्यात मोठे कर्ज झाले. हे कर्ज भरण्यासाठी त्याने बँकेतील २० लाख रुपये आणि १५० ग्रॅम सोन्याचे दागिने काढून ते विकून कर्ज फेटले. ही बाब त्याची आई व बहिणीला माहिती नव्हती.

काही दिवसांपूर्वी त्यांच्या लक्षात हा प्रकार आला. तेव्हा त्यांनी साईनाथकडे त्याची विचारणा केली. त्याने खेळलेल्या सट्टेबाजीवर सर्व पैसा घालविल्याने त्यांनी त्याला विरोध केला व हे सर्व थांबविण्यास सांगितले. सट्टा खेळण्यास विरोध केल्याने रागावलेल्या साईनाथ याने २३ नोव्हेंबरला कामावर जाण्यापूर्वी जेवणामध्ये विषारी द्रव्य मिसळले. त्यानंतर तो कामाला निघून गेला. दुपारी जेवण केल्यावर दोघांना त्रास होऊ लागला. तेव्हा आईने साईनाथला बोलावून घेतले व डब्बा खाऊ नको असे सांगितले. साईनाथ घरी आला, परंतु आई व बहीण बेशुद्ध होईपर्यंत त्याने काहीही केले नाही. दोघी बेशुद्ध पडल्यावर त्याने रुग्णालयात नेले. परंतु, तोपर्यंत उशीर झाला होता. चार पाच दिवसांच्या उपचारानंतरही त्या शुद्धीवर आल्या नाहीत. सुनीता यांचा २७ नोव्हेंबर, तर अनुषा हिचा २८ नोव्हेंबर रोजी मृत्यू झाला. त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले.

अंत्यसंस्कारानंतर सांत्वनेसाठी घरी नातेवाईक जमले असताना साईनाथ याने खरा प्रकार सर्वांना सांगितला. नातेवाईकांनी पोलिसांकडे तक्रार केल्यावर पोलिसांनी साईनाथ याला अटक केली.