‘या’ मुस्लिम देशात समुद्रात सापडलं 2000 वर्षापुर्वीचं मंदिर, खजिन्यानं ‘खचा-खच’ भरलेले जहाज देखील आढळलं

कैरो : वृत्त संस्था – इजिप्तचे सर्वात जुने शहर हेराक्लियनमध्ये सुमारे 2,200 वर्ष जुने मंदिर सापडले आहे. सर्वात आश्चर्यची बाब ही आहे की, हे एक ग्रीक मंदिर आहे. समुद्रात सापडलेले हे मंदिर खुप विखुरलेले आहे. मंदिराच्या खांबांशिवाय मातीची भांडी आणि अनेक प्रकारचे दागिनेसुद्धा मिळाले आहेत.

या मंदिराचा शोध इजिप्त आणि युरोपच्या पुरातत्व शास्त्रज्ञांनी एकत्रितपणे लावला आहे. पुरातत्व शास्त्रज्ञांच्या नुसार मंदिर ज्या उत्तर भागात मिळाले त्यास इजिप्तचे अटलँटिस म्हटले जाते. इजिप्त एक मुस्लिम देश असला तरी आजपासून हजारो वर्षांपूर्वी त्याची ओळख मंदिरांचा देश म्हणून होती.

या मंदिराच्या आत तांबे आणि दागिने मिळाले आहेत. पुरातत्व शास्त्रज्ञांनी सांगितले की, सुमारे हजार वर्षांपूर्वी हे मंदिर समुद्रात बुडाले होते. या मंदिराची रचना तिसर्‍या आणि चौथ्या शतकातील आहे. मंदिरासोबत बुडालेल्या जहाजातून मिळालेली तांब्याची नाणी राजा क्लाडियस टॉलमी द्वितियच्या कार्यकाळातील आहे. हेराक्लियनला एकेकाळी मंदिरांचे शहर म्हणून ओळखले जात होते.

हा शोध घेणार्‍या पुरातत्व शास्त्रज्ञांच्या टीमला समुद्राच्या तळाशी अनेक हजार वर्षांपूर्वीची जहाजेही मिळाली आहेत. त्यामध्ये शस्त्र, क्रॉकरी, नाणी आणि दागिन्यांनी भरलेली भांडी आहेत. हे सर्व चौथ्या शतकातील आहे. इतिहासकारांच्या म्हणण्यानुसार हेराक्लियनला एकेकाळी मंदिरांचे शहर म्हटले जात होते. परंतु, नंतरच्या वर्षात आलेल्या सुनामीमुळे हे शहर पूर्णपणे उद्ध्वस्त झाले. राजा क्लाडियस टॉलमी द्वितियच्या राज्यात हे शहर पूर्णपणे विकसित होते. त्याने हे शहर अतिशय उत्कृष्ट पद्धतीने विकसित केले होते. हजारो वर्षांपूर्वी या शहराला इजिप्तची व्यापारी राजधानी मानले जात होते. आता हे शहर अबू-किर खाडीच्या नावाने ओळखले जाते.

राजा क्लाडियस टॉलमी द्वितीय आणि हेराक्लियन
टॉलमी एक चांगला राजा होता. सोबतच एक प्रसिद्ध ज्योतिर्विद सुद्धा होता. इजिप्शियन कॅलेंडरसाठी त्याने पृथ्वीची एक फेरी मारण्यासाठी चंद्राला जो वेळ लागतो त्याचा उल्लेख केला होता. त्याने प्रकाशाच्या नियमावरही अनेक इजिप्शियन सिद्धांत मांडले आहेत. भूगोल आणि विज्ञानाच्या क्षेत्रात त्याने मोठे योगदान दिले आहे. त्याचा जन्म टॉलेमस सरसीच्या पेलुसियममध्ये झाला. आपल्या राज्याच्या दरम्यान त्याने इजिप्तमध्ये अनेक मंदिरे बांधली. त्याच्या काळात इजिप्त आर्थिकदृष्ट्या खुप मजबूत झाला होता. एक शहर म्हणून त्याने हेराक्लियनचा कायापालट केला होता. यामुळेच त्यास या शहराचा निर्माता म्हटले जाते.

यामुळे बुडाले शहर
या शोधापूर्वी 12 वर्ष अगोदर सुद्धा आर्कियोलॉजिस्ट डॉ. फ्रेंक गोडियो यांनी इजिप्तच्या किनारी भागात फ्रेंच युद्धनौका शोधल्या होत्या, ज्या 18व्या शतकातील होत्या. डॉ. फ्रेंक गोडियो यांच्यानुसार सुमारे 4 वर्षांच्या अथक परिश्रमानंतर हे शक्य झाले होते. या शहराच्या किती भागात लोक राहात होते, याचे काल्पनिक चित्र तयार करण्यास एक वर्ष लागले होते. शोधाच्या दरम्यान समोर आले की, हे शहर जेव्हा वसले तेव्हा पाण्याची पातळी त्या किनार्‍यावर सतत वाढत होती. यामुळेच हे शहर बुडाले.