आमदार असताना झोपा काढल्या का ? माजी मंत्री पाचपुतेंना आ. राहुल जगताप यांचा सवाल

अहमदनगर : पोलीसनामा ऑनलाईन – माजी मंत्री बबनराव पाचपुते हे आता कुकडीच्या सुधारित आराखड्यास प्रशासकीय मान्यता दिल्याचा सांगताहेत. आता तुम्ही साधे आमदारही नसतानाही बोलत आहात. मंत्री, आमदार असताना तुम्ही काय झोपा काढल्यात का, असा आरोप आमदार राहुल जगताप यांनी केला आहे.
आज कुंडलिक्राव सहकारी साखर कारखान्याची वार्षिक सर्वसाधारण सभा पार पडली या सभेत बोलताना आ. जगताप म्हणाले की, कुकडीच्या पाणी वाटप नियोजनात बबनराव पाचपुते यांनी हस्तक्षेप केला. त्यामुळे शेतक-यांना वेळेवर पाणी मिळाले नाही. तुम्ही आता कोणत्याही पक्षाचे चिन्ह घ्या. तुम्हाला घरी बसविल्याशिवाय राहणार नाही, असा इशाराही दिला आहे.
कुंडलिकराव जगताप साखर कारखान्याने एफआरपीपेक्षा ५०० रुपये जादा भाव दिला. त्यामुळे केंद्र शासनाने कारखान्यास ३० टक्के कर भरावा, अशी नोटीस बजावली आहे. आघाडीचे सरकार असताना मी सयाजीराव होतो, असे पाचपुते यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सभेत
म्हटले होते. मग त्यांनी कोट्यवधी रुपयांची माया कशी जमविली? यावेळी सयाजीरावांनी सह्या फक्त स्वत:च्या विकासासाठी केल्या का, अशी टिकाही आ. जगताप यांनी केली आहे.