नाक्यावर लूट होऊनही कॅन्टोन्मेंट बोर्ड का ‘उदार’ ?

अहमदनगर : पोलीसनामा ऑनलाइन – कॅन्टोन्मेंट बोर्डाच्या नाक्यावर वाहनचालकांची लूट होते. याबाबत अनेक वेळेस गुन्हे दाखल झालेले आहेत. चालकांचे व्हिडिओही सोशल मीडियावर व्हायरल झालेले आहेत. वारंवार या नाक्यावर वाहनचालकांची लूट होत असल्याचे उघडकीस येऊनही कँटोन्मेंट बोर्ड एका विशिष्ट व्यक्तीवर का उदार झाले आहे? त्याच व्यक्तीला नाके का चालविण्यास दिले येतात? असे प्रश्न उपस्थित होऊ लागले आहेत. या भूमिकेमुळे बोर्ड प्रशासन संशयाच्या फेऱ्यात अडकले आहे.

कॅन्टोन्मेंट हद्दीतून जाणाऱ्या नाक्यावर बोर्डाकडून शुल्क आकारले जाते. त्यासाठी नाके उभारण्यात आले आहेत. मात्र परप्रांतीय वाहनचालकांची या नाक्यावर लूट केली जाते. याबाबत ‘व्हिडीओ’ सोशल मीडियावर व्हायरल झालेले आहेत. तसेच पोलिसांनी केलेल्या कारवाईत ही लूट झाल्याचे उघडकीस आले आहे. याप्रकरणी अगदी दोन वर्षांपूर्वी भिंगार कॅम्प पोलीस ठाण्यात दरोड्याचा गुन्हा दाखल आहे. मागील आठवड्यात वाहतुक शाखेचे पोलिस निरीक्षकांसमोरच वाहनचालकांची लूट केली जात असल्याचेही उघड झाले आहे. असे असतानाही कॅन्टोन्मेंट बोर्ड ही वसुली करणाऱ्या ठेकेदारावर का उदार झालेले आहे? यामागचे नेमके गौडबंगाल काय, असा प्रश्न आता उपस्थित होऊ लागला आहे.

नागरिकांची अनेक वर्षांपासून लूट करणाऱ्या व्यक्तीकडेच वसुलीची जबाबदारी का, असा प्रश्न अनुत्तरीतच आहे. सदर व्यक्ती दुसऱ्या व्यक्तींच्या नावाने करवसुलीचे ठेका घेतो, अशी चर्चा आहे. मात्र विशिष्ट व्यक्तीच वसुली करतो, हे जगजाहीर आहे. असे असतानाही कॅन्टोन्मेंट बोर्ड त्यांच्यावर उदार होत असल्याने कॅन्टोन्मेंट बोर्डाच्या भूमिकेबद्दल संशय व्यक्त केला जात आहे. परप्रांतीय वाहनचालकांची आर्थिक लूट करण्यासोबत त्यांना मारहाणही केली जाते. असा गंभीर प्रकार सुरू असताना प्रशासनाची ही उदारता संशयाच्या फेऱ्यात अडकली आहे. भरदिवसा खुलेआमपणे रहदारीच्या रस्त्यावर परप्रांतीय वाहन चालकांची लूट होते. तरीही प्रशासन मूग गिळून गप्प बसते. त्यामुळे शंकेला जागा होते. प्रशासनाच्या या भूमिकेमुळे वाहनचालकांमध्ये तीव्र संतापाची लाट उसळली आहे.

Visit : Policenama.com