खळबळजनक ! दिवसाढवळ्या चाकूचा धाक दाखवून लुटले 17 लाख, आमदार निवासाजवळील घटना

नागपूर : पोलीसनामा ऑनलाइन – विविध ठिकाणाहून गोळा केलेली रोकड बँकेत, एटीएममध्ये जमा करण्यासाठी कर्मचारी जात असताना दुचाकीवरून आलेल्या सहा आरोपींनी चाकूचा धाक दाखवून 17 लाखांची रोकड लुटल्याची खबळजनक घटना नागपूरमध्ये घडली आहे. दिवसाढवळ्या घडलेल्या घटनेमुळे शहरात खळबळ उडाली आहे.

ही घटना आज (सोमवार) दुपारी दीडच्या सुमारास वर्दळीचा परिसर असलेल्या आमदार निवासाजवळ घडली. सुत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, रोकड जमा करून ती बँकेत आणि एटीएममध्ये जमा करण्याचे काम एका खासगी कंपनीला देण्यात आले आहे. या कंपनीचे कर्मचारी नेहमीप्रमाणे आज विविध ठिकाणाहून 17 लाखांची रोकड गोळा केली. जमा झालेली रक्कम बँकेत जमा करण्यासाठी कंपनीचे दोन कर्मचारी एका दुचाकीवरून जात होते. दुपारी दीडच्या सुमारास ते राजाराणी चौकातील आमदार निवस्थानाजवळ आले असता मागून दुचाकीवरून सहा जण आले.

दुचाकीवरून आलेल्या चोरट्यांपैकी एकाने कर्मचाऱ्यांच्या दुचाकीला लाथ मारून त्यांना खाली पाडले. त्यानंतर त्यांना चाकूचा धाक दाखवून त्यांच्याकडे असलेली 17 लाख रुयांची बॅग हिसकामारून पळवून नेली. अचानक घडलेल्या घटनेमुळे कर्मचारी घाबरून गेले. त्यांनी याची माहिती आपल्या वरिष्ठांना कळवली. त्यानंतर घटनेची माहिती पोलीस नियंत्रण कक्षाला फोन करून कळवली. दिवसाढवळ्या घडलेल्या या घटनेमुळे पोलीस प्रशासनात खळबळ उडाली.
या घटनेची माहिती नियंत्रण कक्षातून सीताबर्डी पोलिसांना देण्यात आली.

घटनेची माहिती मिळताच सिताबर्डी पोलिसांचा फौजफाटा तात्काळ घटनास्थळी दाखल झाला. तसेच परिमंडळ दोनचे पोलीस उपायुक्त विनिता शाहू, गुन्हे शाखेचे पोलीस उपायुक्त गजानन शिवलिंग राजमाने घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी कर्मचाऱ्यांकडून माहिती घेतली. घटनास्थळाची पाहणी करून आजूबाजूच्या ठिकाणचे सीसीटीव्ही फुटेज ताब्यात घेण्यात आले. या फुटेजच्या मदतीने चोट्यांचा शोध घेण्यास पोलिसांनी सुरु केले.