आयुक्त-महापौर वाद पोलीस ठाण्यात, महापौरांची IAS तुकाराम मुंढे विरोधात फसवणुकीची तक्रार

नागपूर : पोलीसनामा ऑनलाइन –   नागपूर महापालिकेत महापौर संदीप जोशी आणि आयुक्त तुकाराम मुंढे यांच्यातील वाद आता विकोपाला गेल्याचे पहायला मिळत आहेत. जोशी यांनी मुंढे यांच्यविरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यासाठी थेट पोलीस ठाणे गाठले. जोशी यांनी मुंढे यांच्या विरोधात तक्रार दिली असली तरी अद्याप पोलिसांनी गुन्हा दाखल केलेला नाही. स्मार्ट आयुक्तांचा स्मार्ट घोटाळा असे म्हणत जोशी यांनी मुंढे यांच्यावर आरोप केला आहे. यसंदर्भात पोलीस हे आर्थिक गुन्हे शाखेमार्फत तपास करणार असल्याची माहिती महापौर संदीप जोशी यांनी दिली. मात्र, यावर अद्याप तुकारम मुंढे यांनी कोणताही खुलासा केलेला नाही.

ही तक्रार नागपूर महापालिकेच्या कारभारावरून करण्यात आली नसून नागपूर स्मार्ट सिटीच्या कारणावरून करण्यात आली आहे. नागपूर स्मार्ट सिटी या कंपनीच्या संचालक पदावरून हा वाद निर्माण झाला आहे. तुकाराम मुंढे हे सध्या स्मार्ट सीटीचे सीईओ आहेत. त्यांना संचालकपदी घेण्यासाठीची बैठक झालेली नसतानाही ते संचालक झाले आणि सीईओ देखील झाले, असा आक्षेप जोशी यांनी घेतला आहे. या कंपनीची शेवटची बैठक डिसेंबरमध्ये झाली आणि मुंढे हे जानेवारीमध्ये नागपूरमध्ये रुजू झाले.
कंपनीत त्यांची संचालक म्हणून नियुक्ती झालेली नसतानाही ते सीईओ झाले. त्यांनी कंपनीच्या बँकखात्याचे अधिकार आपल्याकडे घेतले. हे अधिकार आल्यानंतर त्यांनी वीस कोटी रुपयाची बिले ठेकेदाराला दिली. कंपनीच्या धानादेशावर सह्या केल्या असा आरोप जोशी यांनी केला आहे.

महापालिकेतील वादाचा आणि या तक्रारीचा काहीही संबंध नसल्याचे महापौर जोशी यांनी स्पष्ट केले आहे. तुकाराम मुंढे यांच्या म्हणण्यानुसार कंपनीच्या चेअरमनकडून मला मौखिक सूचना देण्यात आली होती, म्हणून मी स्मार्ट सिटीत रुजू झालो असल्याचा दावाही त्यांनी खोडून काढला. कंपनी कायद्यानुसार कोणाच्या मौखिक सांगण्यावरून संचालक म्हणून येता येत नाही. याबाबत पोलिसांना मी माझ्या जवळ असलेली सर्व कागदपत्रे दिली आहेत. तसेच पंतप्रधान कार्यालय, मुख्यंमत्री कार्यालय, नगरविकास विभाग, आयएएस अधिकाऱ्यांची संघटना या सर्व ठिकाणी तक्रारी करणार असल्याचे जोशी यांनी सांगितले.