खळबळजनक ! भर चौकात काँग्रेसच्या माजी नगरसेवकाचा कुर्‍हाडीनं घाव घालून खून

नागपूर : पोलीसनामा ऑनलाइन – उपराजधानी नागपूर काँग्रेसच्या माजी नगरसेवकाच्या खुनाने हादरुन गेली आहे. काँग्रेसचे माजी नगरसेवक देवा ऊसरे यांचा दोन अज्ञात हल्लेखोरांनी कुऱ्हाडीने सपासप वार करून खून केला. ऊसरे यांचा दिवसाढवळ्या खून करण्यात आल्याने नागपूर शहरात खळबळ उडाली आहे. ही घटना सदर पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडली आहे. नागपूरात गेल्या 24 तासात दोन खूनाच्या घटना घडल्याने नागरिकांमध्ये भितीचे वातावरण आहे.

आज (रविवार) सकाळी नागपूरच्या भारत टाकीजजवळ सकाळी नऊच्या सुमारास ही घटना घडली आहे. देवा ऊसरे यांच्यावर दोन अज्ञात आरोपींनी कुऱ्हाडीने वार कर खून केला. हा खून नेमका कोणत्या कारणामुळे झाला हे अद्याप स्पष्ट झाले नसून जुन्या वादातून हा खून झाल्याची माहिती समोर आली आहे.

देवा ऊरसे हे गड्डीगोदाम परिसरात राहतात. आज सकाळी उसरे चहा घेण्यासाठी घराशेजारी एका टपरीवर आले होते. त्यांनी आपली दुचाकी लावून खाली उतरले असता तेवढ्यात दोन तरुणांनी त्यांच्यावर कुऱ्हाडीने सपासप वार केले. अचानक झालेल्या या हल्ल्यात ऊसरे हे गंभीर जखमी झाले. रक्ताच्या थारोळ्यात ते जमिनीवर कोसळले. त्यानंतर हल्लेखोरांनी घटनास्थळावरून पळ काढला. स्थानिक लोकांनी घटनेची माहिती पोलिसांना दिली.

घटनेचा माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी ऊसरे यांना तातडीने रुग्णालयात दाखल केले. मात्र, रक्तस्त्राव जास्त झाल्याने डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. ऊसरे यांच्या पश्चात पत्नी, दोन मुले, दोन भाऊ असा परिवार आहे. 54 वर्षीय ऊसरे हे पहलवान म्हणून ओळखले जात होते. ऊसरे हे काँग्रेसच्या तिकिटावर दोनदा नगरसेवक म्हणून निवडून आले होते. याप्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल करून पुढील तपास सुरु केला आहे.