मुख्यमंत्र्यांनी विदर्भाला वाऱ्यावर सोडलं, काँग्रेस आमदाराचा सरकारला घरचा आहेर

नागपूर : पोलीसनामा ऑनलाइन – पूर्व विदर्भात पुराचे तांडव निर्माण झाल्याने शेकडो संसार नेस्तनाबूत झाले आहेत. या पार्श्वभूमीवर काँग्रेसचे आमदार आशिष देशमुख यांनी राज्य सरकारवर टीका करत घरचा आहेर दिला आहे. पूरपरिस्थितीत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांनी विदर्भाला वाऱ्यावर सोडल्याचा घणाघाती आरोप देशमुख यांनी करत सरकारवर आणि पक्षाच्या ज्येष्ठ नेत्यावर टीकास्त्र सोडलं आहे. ते प्रसारमाध्यमांशी बोलत होते.

आशिष देशमुख म्हणाले, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे प्रकृतीच्या कारणास्तव व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे संवाद साधत आहेत. मात्र, पुरामुळे हजारो लोक देशोधडीला लागले आहेत. संसार उध्वस्त झाले आहेत. अशावेळी मुख्यमंत्र्यांनी पूरपरिस्थितीची हवाई पाहणी करायला हवी होती. पण अद्याप ते विदर्भाकडे फिरकलेले नाहीत. महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांनीही विदर्भात अद्याप पाहणी दौरा केलेला नाही. याशिवाय राज्यात इतर शहरांप्रमाणेच नागपुरातही कोरोनाचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात झाला आहे. पण आरोग मंत्री राजेश टोपे हे देखील नागपूरकडे फिरकले नाही असे सांगत टोपे नेमके कुठे आहेत ? असा संतप्त सवाल त्यांनी उपस्थित केला.

दरम्यान, पावसाची संततधार थाबल्याने पूर ओसरेल असे वाटत असताना मध्य प्रदेशातील संजय सरोवर आणि गोंदिया जिल्ह्यातील पुजारीटोला धरणाचे पाणी सोडण्यात आले. त्यामुळे वैनगंगा नदीला पूर आला आहे. त्याचवेळी गोसेखुर्द प्रकल्पाची दारे उघडून पूरनियंत्रणात करणे आवश्यक असताना प्रशासन गाफिल राहिले. याचा परिणाम भंडारा शहरासह 58 गावामध्ये पुराचे पाणी शिरले. त्यामुळे पूर्व विदर्भात गेल्या 100 वर्षात पहिल्यांदाच पूरपरिस्थितीची परिस्थिती निर्माण झाली आहे. त्यामुळे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.

चंद्रपूर जिल्ह्यातील पुरग्रस्तांना दहा हजारांची तातडीची मदत जाहीर करण्यात आली आहे. येत्या एक दोन दिवसांत खात्यात पैसे जमा होणार असल्याची माहिती विजय वडेट्टीवार यांनी दिली आहे. तसेच भंडारा चंद्रपूर, गडचिरोली जिल्ह्यात पीकहानी, घरे पडणे, रस्ते व पूल वाहून जाणे अशा स्वरुपाचे कोट्यावधी रुपयांचे नुकसान झाले आहे. या नैसर्गिक आपत्तीत प्रशासनानं युद्ध पातळीवर पंचनामे करुन अहवाल सादर करण्याचे आदेश दिले आहेत.