धक्कादायक ! ABVP चे महामंत्री ओव्हाळ यांचा धबधब्यात बुडून मृत्यू

नंदूरबार : पोलीसनामा ऑनलाइन –   आखिल भारतीय विद्यार्थी परिषदेचे (ABVP) महामंत्री अनिकेत ओव्हाळ यांचा नंदुरबार जिल्ह्यातील बिलगाव (ता. धडगाव ) येथील धबधब्यामध्ये बुडून मृत्यू झाला (abvp-mahamantri-aniket-ovhal-passed-away) आहे. बुधवारी (दि. 11) दुपारी दोनच्या सुमारास ही घटना घडली आहे.

ओव्हाळ हे संघटनेतील कार्यकर्त्यांच्या भेटीगाठी घेण्यासाठी धडगाव तालुक्यात आले होते. त्यानंतर ते आपल्या 6 मित्रांसमवेत सकाळी बिलगाव परिसरात धबधबा ( Waterfalls) पाहण्यासाठी गेले. दुपारी दोनच्या सुमारास अंघोळीसाठी पाण्यात उतरल्यानंतर परतत असताना त्यांचा पाय घसरल्याने ते पाण्यात पडून बुडू लागले. त्यांना वाचवण्यासाठी त्यांचे मित्र विराज ठाकरे यांनी धाव घेतली. मात्र, तेदेखील पाण्यात बुडत असल्याने त्यांना कसेबसे बाहेर काढण्यात यश आले. मात्र यात ओव्हाळ यांचा मृत्यू झाला. सिद्धेश्वर लटपटे यांनी दिलेल्या माहितीवरून त्यांच्या मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. त्यांचा मृतदेह सध्या धडगाव उपजिल्हा रुग्णालयात आणण्यात आला आहे. दरम्यान, अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेचे अनिकेत ओव्हाळ हे राज्यभरातील आपल्या संघटनेचे बाजू हिरिरीने मांडणारा तरुण म्हणून परिचित होते. त्यांच्या मृत्यूनंतर विविध क्षेत्रातील लोकांकडून शोक व्यक्त करण्यात येत आहे.