नाथाभाऊंमुळे राष्ट्रवादीची ताकद वाढेल : शरद पवार

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन नाथाभाऊंमुळे राष्ट्रवादीची (NCP) ताकद वाढेल यात माझ्या मनात काहीही शंका नाही, असं शरद पवार (Sharad pawar) यांनी म्हटलं आहे. एक काळ असा होता की जळगाव जिल्हाही राष्ट्रवादी विचारांचा होता. मात्र हा विचार नंतर मागे पडला, त्यामुळे भाजपाची (bjp) ताकद वाढली. जळगावात भाजपा मोठा होण्यामागे एकनाथ खडसे (eknath khadse) यांची मेहनत होती. मात्र त्या पक्षाने त्यांच्यावर अन्याय केला. नाथाभाऊ आता आपल्या पक्षात आले आहेत. त्यांनी माझ्याकडे कोणतीही मागणी केली नाही. एका शब्दाने त्यांनी हे सांगितलं नाही की ही माझी अपेक्षा आहे. एकनाथ खडसे यांचा अनुभव पक्षासाठी मोलाचा ठरणार आहे, असंही शरद पवार यांनी म्हटले. आज एकनाथ खडसे यांनी शरद पवारांच्या उपस्थितीत राष्ट्रवादीमध्ये प्रवेश केला. त्यावेळी कार्यक्रमात शरद पवार बोलत होते.

खडसेंचा भाजपवर हल्लाबोल
भूखंडाची चौकशी माझ्या मागे लावण्यात आली. काही दिवस जाऊद्या कुणी किती भूखंड घेतले आहेत ते मी दाखवून देईल. नियमांच्या बाहेर जे वागले आहेत त्यांच्यावर कारवाई करण्याची मागणी मी करणार असल्याचे खडसे यांनी म्हटले आहे. राजकीय जीवनातून घरी बसण्याचीच तयारी केली होती. भाजपाला हेच वाटत होतं, कारण मला भाजपा तर काही देणार नाही. तिकिट मागितलं तर म्हणतात तुम्ही ज्येष्ठ आहात.

मला सांगतात, नाथाभाऊ तुम्ही आम्हाला मार्गदर्शन करा. चार दिवस ज्यांना भाजपात येऊन झाले नाहीत असे लोक म्हणतात मार्गदर्शन करा. मी राष्ट्रवादीत जाणार तर बोंबाबोंब झाली. मग तुम्ही सकाळी पाच वाजता शपथ घेतली तेव्हा तुम्हाला राष्ट्रवादी पक्षच चांगला वाटला ना ? पहाटे पाचला जसा तुम्हाला राष्ट्रवादी पक्ष चांगला वाटला होता, त्यापेक्षा मला राष्ट्रवादी पक्ष चांगला वाटतो आहे. म्हणून मी राष्ट्रवादीत आलो असं म्हणत पहाटेच्या शपथविधीवरही खडसेंनी टीका केली.