निर्भया केस : घटनेच्या वेळी अल्पवयीन असल्याचा दोषी पवनचा दावा

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – निर्भया प्रकरणातील चार दोषींपैकी एक असलेल्या पवन कुमार गुप्ताच्या याचिकेवर आज सुप्रीम कोर्टात सुनावणी होणार आहे. घटनेच्या वेळी तो अल्पवयीन होता, असा दावा त्याने या सुधारित याचिकेत केला आहे. म्हणजे 16 डिसेंबर, 2012 ला तो अल्पवयीन होता, असे त्याचे म्हणणे आहे. सुप्रीम कोर्टात पवनच्या याचिकेवर आज सुनावणी होत आहे. सुप्रीम कोर्टाचे सहा जज इन चेम्बर ही सुनावणी करणार आहेत.

16 डिसेंबर, 2012 च्या रात्री जेव्हा दिल्लीच्या वसंत विहार परिसरात चालत्या बसमध्ये निर्भयावर सामुहिक बलात्कार झाला तेव्हा, तो अल्पवयीन होता, असे पवनचे म्हणणे आहे. निर्भयाच्या चारही दोषींना (पवन कुमार गुप्ता, विनय कुमार शर्मा, मुकेश सिंह आणि अक्षय कुमार सिंह) शुक्रवारी सकाळी 5:30 वाजता फाशी देण्यात येणार आहे. दिल्ली पटियाला हाऊस कोर्टाने यासंदर्भात डेथ वॉरंट जारी केले आहे.

चार दोषींना वाचवण्यासाठी वकील एपी सिंह यांनी फाशीला स्थगिती देण्यासाठी दिल्लीच्या पटियाला कोर्टात याचिका केली आहे, जिच्यावर गुरूवारी सुनावणी होणार आहे. वकील एपी सिंह यांनी म्हटले की, दोषी पवन गुप्ताच्या सुधारित याचिकेवर सुप्रीम कोर्टात सुनावणी बाकी आहे आणि दोषी अक्षय सिंहची दया याचिका प्रलंबित आहे, अशा स्थितीत डेथ वॉरंटला स्थगिती देण्यात यावी. या सोबतच बिहारच्या औरंगाबाद कोर्टात सुद्धा आज अक्षय कुमार सिंहच्या पत्नीच्या घटस्फोटाच्या अर्जावरही सुनावणी होणार आहे.