MP : सलग केलेल्या कामाच्या बदल्यात पोलीस कर्मचार्‍यांना मिळतो दर महिन्याला 18 रूपये विशेष भत्ता

भोपाळ : पोलीसनामा ऑनलाइन –  संपूर्ण महिना विनासुट्टी आणि लागोपाठ काम केल्याच्या बदल्यात प्रोत्साहन म्हणून जर 18 रूपये दिले गेले तर याच्यातून कसले प्रोत्साहन मिळणार. परंतु, ही व्यवस्था मध्य प्रदेश पोलीस दलात आहे. महागाईच्या या काळात गणवेशाच्या धुलाईसाठी पोलीस कर्मचार्‍यांना महिना 60 रूपये दिले जातात. अनेक वर्षांपासून चालत आलेल्या विशेष भत्त्यांची रक्कम इतकी कमी आहे की, याची चर्चा पोलीस कर्मचार्‍यांना सुद्धा हास्यास्पद वाटते. कालबाह्य झालेल्या भत्त्याच्या रक्कमेबाबत पोलीस दलाकडून बदलाचा प्रस्ताव पाठवला आहे, जो सरकार स्तरावर विचाराधीन आहे.

या विशेष भत्त्यात 1979 पासून कोणतीही वाढ झालेली नाही. हा भत्ता कर्मचार्‍यांपासून अधिकार्‍यांपर्यंत सर्वांना दिला जातो. गणवेश धुलाईसाठी शिपायापासून अतिरिक्त पोलीस अधीक्षक स्तरापर्यंत ही रक्कम अवघी 60 रूपये आहे. यामध्ये अखेरची वाढ 2003 मध्ये करण्यात आली होती. याशिवाय गणवेश खरेदीसाठी विभाग आपल्या कर्मचार्‍यांना रक्कम देतो. यासाठी दरवर्षी तीन हजार रूपये दिले जातात. जे पूरे पडत नाहीत. यापूर्वी विभागच गणवेश खरेदी करून देत होता.

पौष्टिक आहारासाठी मिळतात 650 रूपये

पोलीस कर्मचार्‍यांचे आरोग्य चांगले राखण्यासाठी विभागात पौष्टिक आहारासाठी सुद्धा भत्त्याची व्यवस्था आहे. यात शिपायापासून इन्स्पेक्टर स्तरापर्यंत प्रतिमहिना 650 रूपये दिले जातात. इतक्या कमी पैशात महिनाभरासाठी पौष्टिक आहारातून कर्मचारी किती निरोगी राहात असतील हा प्रश्नच आहे. हा भत्ता शेवटचा 2015 मध्ये वाढला. यापूर्वी 350 रूपये मिळत होते.

घर भाड्यासाठी सुद्धा मुळ वेतनाच्या 10 टक्के रक्कम कर्मचार्‍यांना दिली जाते. म्हणजे जर एखाद्या कर्मचार्‍याचे मूळवेतन 20 हजार रूपये असेल तर भोपाळ, इंदौर, जबलपुर आणि ग्वाल्हेर सारख्या शहरात त्याला दोन हजार रूपयात घर भाड्याने शोधावे लागेल. हे सुद्धा अशक्य आहे. पोलीस विभागात पूर्वी मिशांच्या देखरेखीचा भत्ता आणि सायकल भत्त्याची सुद्धा तरतूद होती, मात्र आता तो बंद करण्यात आला आहे. अधिकार्‍यांचे म्हणणे आहे की, पौष्टिक आहारासह काही भत्त्यांमध्ये वाढीचा प्रस्ताव विभागाकडून पाठवण्यात आला आहे, त्यावर अजून निर्णय आलेला नाही. धर्मेद चौधरी, सेवानिवृत्त उप पोलीस महानिरीक्षक, मध्य प्रदेश पोलीस, यांनी म्हटले आहे की, सुविधा वाढवण्यासाठी सरकार वेळोवेळी व्यवस्था करत आले आहे. भत्त्यांच्या रक्कमेत वेळेनुसार बदल करण्यासाठी सहानुभूतिपूर्वक विचार केला पाहिजे.