Coronavirus : ‘कोरोना’च्या पार्श्वभूमीवर भारताची तयारी पाहून WHO ‘प्रभावित’, केलं ‘कौतूक’

नवी दिल्ली : वृत्त संस्था  – जगभरात कोरोनाचा प्रकोप सुरू आहे. जागतिक आरोग्य संघटनेच्या माहितीनुसार आतार्यंत सुमारे 158 देशात कोरोना व्हायरसने शिरकाव केला आहे. जगभरात या व्हायरसने मरणार्‍यांची संख्या 6700 वर पोहचली आहे. चीननंतर सर्वात खराब स्थिती इटलीमध्ये आहे. येथे कोरोनामुळे 24 तासात 349 लोकांचा मृत्यू झाला आहे. तर भारतात आतापर्यंत 120 लोकांना संसर्ग झाला आहे.

आतापर्यंत देशात 2 लोकांचा मृत्यू झाला आहे. देशात काल कोरोनाचे 4 नवीन रूग्ण सापडले. आतापर्यंत 120 जणांना संसर्ग झाल्याचे स्पष्ट झाले आहे. पॉझिटीव्ह लोकांच्या संपर्कात आलेल्या 5200 लोकांची ओळख पटली आहे. या लोकांना देखरेखी खाली ठेवण्यात आले आहे. कोरोनाने पीडित असलेले 13 रूग्ण बरे झाले आहेत.

भारतात केंद्र आणि राज्य सरकार कोरोना व्हायरसचा संसर्ग रोखण्यासाठी प्रत्येक प्रयत्न करत आहेत. या व्हायरसशी लढण्यासाठी उपाययोजनांबद्दल जागतिक आरोग्य संघटनेने कौतूक केले आहे. भारतातील डब्ल्यूएचओचे प्रतिनिधी हेंक बेकडाम यांनी म्हटले की, कोरोना व्हायरसला तोंड देण्यासाठी वरीष्ठ पातळीवर विशेषता पंतप्रधान कार्यालयाकडून जी तत्परता दाखवण्यात आली, ती महत्वाची आणि प्रभावशाली आहे. याच कारणामुळे भारत कोरोनाशी लढण्यासाठी चांगले काम करत आहे. मला हे पाहून आनंद होत आहे की, सर्व लोक या कामासाठी एकत्र आले आहेत.

राष्ट्रीय वैद्यकीय आणि संशोधन परिषदेच्या बैठकीत सहभागी झाल्यानंतर हेंक यांनी मीडियाशी चर्चा केली. ते म्हणाले, भारतात विशेषता आयसीएमआर आणि आरोग्य संशोधन विभागात संशोधनाच्या खुप चांगल्या सुविधा आहेत. ही संस्था व्हायरसला आयसोलेट करण्यासाठी सक्षम आहे, आता भारत सुद्धा रिसर्च गटाचा भाग राहील.

चीनमधून सुरू झालेला कोराना व्हायरस आता जगभरात पसरला आहे. जगभरात 1.75 लाख केस पॉझिटीव्ह आढळल्या आहेत. हा व्हायरस 158 देशात पसरला आहे. जगात सर्वात जास्त 3200 लोकांचा मृत्यू चीनमध्ये झाला आहे. चीननंतर इटलीत सर्वांत जास्त 1809 लोकांचा मृत्यू झाला आहे. रविवार ते सोमवार दरम्यान इटलीत एक दिवसात 368 लोकांचा मृत्यू झाला आहे. स्पेनमध्ये कोरोनामुळे 309 लोकांचा मृत्यू झाला आहे. फ्रान्समध्ये या किलर व्हायरसमुळे 127 लोकांचा मृत्यू झाला आहे. तर इराणमध्ये 850 लोकांनी जीव गमावला आहे. अमेरिकेत कोरोनाचे 3,802 रूग्ण पॉझिटीव्ह असल्याचे स्पष्ट झाले आहे.

कोरोना व्हायरसच्या प्रकोप पाहता आरोग्य मंत्रालयाने अ‍ॅडवायझरी जारी केली आहे. देशभरातील शाळा-कॉलेज, मॉल्स बंद करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. सोबतच पब्लिक ट्रान्स्पोर्टचा कमी वापर करण्याचा सल्ला देण्यात आला आहे. मुंबईत सिद्धिविनायक, महालक्ष्मी, मुंबा देवी मंदिर बंद करण्यात आले आहे. सोबतच उज्जैनच्या महाकाल मंदिरात भक्तांना प्रवेश बंद करण्यात आला आहे. दिल्लीत 31 मार्चपर्यंत जिम, नाइट क्लब, स्पा बंद करण्यात आले आहेत. येथे कोणत्याही कार्यक्रमासाठी 50 पेक्षा जास्त लोक एकत्र येणार नाहीत. गुजरातमध्ये थुंकणार्‍यांवर 500 रुपये दंड लावण्यात आला आहे. आरोग्य मंत्रालयाने हेल्पलाइन नंबर 1075 जारी केला आहे.