‘घरातले वाद लपवण्यासाठीच भाजप आमदार संपर्कात असल्याची अफवा’ : BJP

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – राष्ट्रवादी काँग्रेसने स्वत:च्या घरातले वाद लपवण्यासाठीच भाजपमध्ये पक्षांतर केलेले आमदार संपर्कात असल्याची अफवा पसरवल्याचा आरोप भाजप आमदार आशिष शेलार यांनी केली आहे. आधी राष्ट्रवादीतला विसंवाद दूर करण्यासाठी जयंत पाटील आणि अजित पवारांची समिती नेमा, असा टोलाही आशिष शेलार यांनी लगावला आहे. शेलार यांनी म्हटले की, राष्ट्रवादी काँग्रेस स्वत:च्या घरातला भेद आणि विसंवाद लपवण्यासाठी भाजपचे आमदार राष्ट्रवादीत परत येणार अशा अफवा पसरवण्याचं काम राष्ट्रवादीकडून अतिशय योजनाबध्द पद्धतीने सुरु आहे. या प्रयत्नाला कोणतंही यश मिळण्याची शक्यता दुरान्वयेही नाही.

जयंत पाटील आणि अजित पवार यांनी स्वत:च्या पक्षात जरी संवाद साधला तरी खूप आहे. आधी स्वत:चं सरकार आणि स्वत:चा पक्ष वाचवा असंही ते म्हणाले, भाजपला ना कोणाचा परिवार फोडण्याची इच्छा नाही ना सरकार पाडापाडीत रस आहे, असंही आशिष शेलार यांनी स्पष्ट केलं आहे. दरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रवक्ते आणि कॅबिनेट मंत्री नवाब मलिक सांगितले की, भाजपमध्ये जे आमदार गेले त्यांना तिथं किंमत नाही. त्यामुळे ते पुन्हा राष्ट्रवादीत येऊ पहात आहेत.

हे आमदार शरद पवार आणि अजित पवार यांच्यासोबत संपर्कात आहेत. असे आमदार स्थानिक राजकारणाचा विचार करून पक्ष प्रवेश करत आहेत, असा गौप्यस्फोट नवाब मलिक यांनी केला आहे. तसेच गयारामांना प्रवेश देण्याची जबाबदारी ही उपमुख्यमंत्री अजित पवार आणि जयंत पाटील यांच्यावर असणार आहे. लवकरच राष्ट्रवादीत काही भाजप आमदारांचा प्रवेश करुन घेण्यासाठी हालचाली सुरु आहेत. आमदारांना घेताना शिवसेना आणि काँग्रेसला विश्वासात घेऊन निर्णय घेतला जाणार असल्याचे सुत्रांकडून सांगण्यात येत आहे.

पोलीसनामा न्युज आता टेलीग्रामवर... आमचं चॅनेल (@policenamanews) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा. WhatsAPP

You might also like