उदयनराजेंविरुद्ध कोण लढणार ? जयंत पाटलांनी केलं ‘हे’ वक्तव्य

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा खासदारकीचा राजीनामा दिल्यानंतर उदयनराजे भोसले यांनी भाजपमध्ये प्रवेश केला. उदयनराजे भोसले यांच्या राजीनाम्यामुळे रिक्त झालेल्या जागेवर पोटनिवडणूक जाहीर झाली आहे. या पोटनिवडणुकीत उदयनराजे यांच्या विरोधात तगडा उमेदवार देण्यासाठी राष्ट्रवादी आणि काँग्रेस पक्षाकडून चाचपणी सुरु झाली आहे. उदयनराजे यांच्याविरुद्ध कोण उमेदवार असणार याची उत्सुकता लागून राहिली आहे. याबाबत आता राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी भाष्य केले आहे.

सातारा लोकसभेच्या जागेबाबत पृथ्वीराज चव्हाण यांच्याशी चर्चा केली आहे. मात्र, चव्हाण हे लोकसभेची निवडणूक लढवण्यास उत्सुक नाहीत. सातारा जिल्ह्यात चव्हाण हे काँग्रेसचे मोठे नेते आहेत. त्यामुळे आम्ही पुढील काही दिवसातच सर्वांसोबत चर्चा करून निर्णय घेऊ, असे जयंत पाटील यांनी म्हटलं आहे. परंतु पृथ्वीराज चव्हाण यांनी लोकसभा न लढवता विधानसभा लढवावी असा कार्यकर्त्यांनी आग्रह धरला आहे. त्यामुळे चव्हाण लोकसभा लढवणार की विधानसभा हे लवकरच समजेल. सध्यातरी लोकसभेसाठी त्यांचे नाव आघाडीवर आहे.

निवडणुकांच्या घोषणेनंतर राज्यातील राजकीय वातावरण ढवळून निघाले आहे. महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकांत कोण बाजी मारणार, याबाबत उत्सुकता आहे. मात्र, विधानसभा निवडणुकांसोबतच होत असलेल्या सातारा लोकसभा मतदारसंघातील पोटनिवडणुकीकडे सगळ्यांचं लक्ष लागलं आहे. कारण या मतदारसंघातून नुकताच भाजपमध्ये प्रवेश केलेल्या उदनराजे भोसले यांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे.

Visit : policenama.com