शरद पवारांनी बाप बदलला नाही तर ते स्वत: बाप झाले, आव्हाडांचे नाईकांना ‘प्रत्युत्तर’ (व्हिडिओ)

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – नवी मुंबई महापालिकेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय नेत्यांकडून एकमेकांवर आरोप प्रत्यारोपाच्या फैरी झाडल्या जात आहेत. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते आणि मंत्री जितेंद्र आव्हाड आणि भाजप नेते गणेश नाईक यांच्यामध्ये द्वंद्व युद्ध सुरु झाले आहे. दोन्ही नेते एकमेकांवर आरोप करण्याची एकही संधी सोडताना दिसत नाही. शरद पवारांनी बाप बदलला नाही तर ते स्वत: बाप झाले, अशा शब्दात जितेंद्र आव्हाड यांनी गणेश नाईक यांना पुन्हा प्रत्युत्तर दिले आहे. तसेच गणेश नाईक यांना उपकाराची जाणीव नसल्याचे आव्हाड यांनी म्हटलं आहे.
https://twitter.com/AwhadOffice/status/1237706453839794176
जितेंद्र आव्हाड यांनी ट्विटवर व्हिडिओ शेअर करत गणेश नाईक यांच्यावर हल्लाबोल केला आहे. आव्हाड म्हणाले, शरद पवार यांनी 1977 आणि 1999 साली पक्ष काढला. तुमच्या सारखे 60 ते 70 आमदार निवडून आणले. माझ्या सारख्या गरीबाच्या मुलाला इथपर्यंत आणलं कारण ते बाप झाले म्हणून. त्यामुळे आज तुमच्या विधानावरून तुम्ही दाखवून दिले की तुम्ही कृतघ्न आहात. हे मी पुराव्यानिशी आगरी समजाला दाखवून देणार आहे. तुम्ही आगरी समाजाच्या कधी पाठीशी उभे राहिला नाहीत. तुम्ही कधी नवी मुंबईतील गावांच्या पुनरसीमांकनासाठी पुढे आला नाहीत, असे आव्हाड यांनी म्हटलं आहे.

नवी मुंबई एवढ्या अडचणीत आहे मात्र त्यावर कधी भाष्य केले नाही. मात्र, स्वत:च्या राजकीय हेतू साध्य व्हावा म्हणून तुम्ही मुलाचा ही बळी दिला. तुम्हाला तुमच्यावर केलेल्या उपकारांची मग ते नवी मुंबईकरांनी असो, आगरी समाजाने असो, बाळासाहेबांनी असो की शरद पवारांनी असो त्याची जाणीव तुम्हाला नाही. कारण तुम्ही कृतघ्न आहात. हे तुम्ही तुमच्या विधानावरून स्पष्ट केलं आहे. कोणत्यातरी फडतूस सिनेमाचा डायलॉग मारून बाप तुम्ही काढला होता, मी नाही, असे बोलत त्यांनी गणेश नाईक यांच्यावर हल्लाबोल केला.