आनंदराव पाटलांच्या हत्येनंतर आणखी एका राष्ट्रवादी नेत्याची हत्या, धारधार शस्त्रांने वार करून संपवलं

सांगली : पोलीसनामा ऑनलाइन  – राष्ट्रवादी काँग्रेसच्या आणखी एका नेत्याची हत्या झाल्याने राजकीय खेत्रात खळबळ उडाली आहे. सांगली जिल्ह्यातील राष्ट्रवादीचे कवठेमहांकाळचे नेते आणि माजी पंचायत समिती सभापती मनोहर पाटील यांचा तालुक्यातील देशींग येथे अज्ञात मारेकर्‍यांनी धारधार शस्त्रांनी वार करून खून केल्याची घटना घडली आहे. राष्ट्रवादीचे आनंदराव पाटील यांची हत्या झाल्याचे प्रकरण ताजे असतानाच राष्ट्रवादीच्या आणखी एका नेत्याची हत्या झाल्याने जिल्ह्यात खळबळ उडाली आहे. मनोहर पाटील यांचा खून पूर्ववैमनस्यातून झाल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त होत आहे.

या बाबत सविस्तर असे की, राष्ट्रवादी काँग्रेसचे कवठेमहांकाळ तालुक्याचे नेते मनोहर पाटील हे बुधवारी सायंकाळी तालुक्यातील देशींग येथील बोरगाव रस्त्यावर बोलत थांबले असताना अचानक काही अज्ञात मारेकरी तेथे आले आणि त्यांनी बेसावध असलेल्या पाटील यांच्यावर धारधार शस्त्रांनी जीवघेणा हल्ला केला. या हल्ल्यात पाटील गंभीर जखमी होऊन खाली कोसळले. यानंतर मारेकरी पळून गेले. जवळपासच्या ग्रामस्थांनी पाटील यांना मिरज येथील मिशन हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल केले. परंतु, गंभीर दुखापत झालेली असल्याने पाटीच यांचा उपचार सुरू असताना मृत्यू झाला.

राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते असलेले मनोहर पाटील यांचे कवठेमहांकाळ तालुक्यातील हरोली हे गाव आहे. ते गावाचे उपसरपंच सुद्धा होते. 2017 मध्ये ते पंचायत समिती सदस्य म्हणून निवडूण आले. यानंतर ते कवठेमहांकाळ पंचायत समितीचे सभापती होते. सध्या ते तालुक्यातील महंकाली साखर कारखान्याचे संचालक होते. मनोहर पाटील यांची अज्ञात मारेकर्‍यांनी हत्या केल्याचे वृत्त सर्वत्र पसरताच गावातील वातावरण तणावपूर्ण झाले आहे. कोणताही अनुचित प्रकार घडू नये, यासाठी पोलिसांनी सर्वत्र बंदोबस्त तैनात केला आहे.

पोलिसांनी खूनाचा गुन्हा दाखल केला असून तपास सुरू केला आहे. हा खून पूर्ववैमनस्यातून झाल्याचा प्राथकिमक अंदाज असल्याने त्यादृष्टीने तपास सुरू आहे. राष्ट्रवादी काँग्रेसच्या स्थानिक नेत्याची हत्या होण्याची चार दिवसातील ही दुसरी घटना असल्याने सर्वत्र खळबळ उडाली आहे. चार दिवसांपूर्वी पलूस तालुक्यातील राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आनंदराव पाटील यांची हत्या झाली होती. अवघ्या चार दिवसांनंतर आणखी एका नेत्याची हत्या झाल्याने जिल्ह्यातील राजकीय क्षेत्र हादरून गेले आहे.