‘अमृता फडणवीस यांना ट्रोल करण्याचा अधिकार’, ठाकरे सरकारमधील ‘या’ महिला मंत्र्याचं वादग्रस्त वक्तव्य

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता या सोशल मीडियावर अधूनमधून अशी काही वक्तव्य करत असतात, ज्यावरून मोठी चर्चा होत असते. त्यांच्या या वक्तव्यांमुळे सोशल मीडियावर त्यांना नेहमीच मोठ्या प्रमाणात ट्रोल केले जाते. या संदर्भात प्रतिक्रिया देताना राष्ट्रवादीच्या राज्यमंत्री आदिती तटकरे यांनी एक वक्तव्य केले असून त्यावरून वाद निर्माण होण्याची शक्यता आहे. पिंपरी चिंचवड येथे महाराष्ट्र राज्य छत्रपती शिवाजी महाराज कबड्डी स्पर्धा होणार आहेत. त्या संदर्भातील माहिती देण्यासाठी अदिती येथे आल्या असताना त्या पत्रकारांशी बोलत होत्या.

राज्यमंत्री आदिती तटकरे यांनी म्हटले की, अमृता फडणवीस यांना त्यांचे मत व्यक्त करण्याचा जसा अधिकार आहे तसाच, फॉलोअर्सना त्यांना ट्रोल करणाचाही अधिकार आहे. क्रीडा राज्यमंत्री अदिती तटकरे यांच्या या वक्तव्यावरून वाद निर्माण होऊ शकतो, असे म्हटले जात आहे.

महिला दिनाच्या निमित्ताने आपली प्रतिक्रिया व्यक्त करताना आदिती म्हणाल्या, पन्नास टक्के आरक्षण नसताना ज्या दिवशी महिलांना संधी दिली जाईल, तो खरा महिला दिवस असेल. राज्यात दिशा कायदा लागू करण्याआधी तो एवढा कठोर करा की आपल्याला इतर राज्यात अभ्यासासाठी जाण्याची वेळ येऊ नये.

मागील काही महिन्यांपासून माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस या देखील ट्विटरवर सक्रिय झाल्या आहेत. काही दिवसापूर्वी उद्धव ठाकरे आणि देवेंद्र फडणवीस या दोन राजकीय नेत्यांमध्ये राजकीय आरोप-प्रत्यारोप रंगले असताना अमृता फडणवीस यांनी त्यामध्ये उडी घेतली होती, त्यावरूनही त्या सोशल मीडियावर ट्रोल झाल्या होत्या. काही दिवसापूर्वी त्यांनी मंत्री आदित्य ठाकरे यांनाही वादग्रस्त उपमा दिली होती. अशाप्रकारे त्या सातत्याने वादग्रस्त वक्तव्य करत असल्याने सोशल मीडियावर ट्रोल होत आहेत. यावरूनच आज राष्ट्रवादीच्या राज्यमंत्री आदिती तटकरे यांनी ही प्रतिक्रिया दिली आहे. आदिती तटकरे या राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते सुनील तटकरे यांच्या कन्या आहेत.