फडणवीसांना उत्तर दिल्यानंतर रोहित पवारांनी दाखवली मोदी सरकारची ‘ही’ चूक

अहमदनगर : पोलीसनामा ऑनलाईन – आमदार रोहित पवार यांना कॅलक्युलेशन समजत नाही अशी टीका भाजपाचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केली होती. भाजपाचे माजी मंत्री प्रा. राम शिंदे यांनी पवारांना नॉलेज नसल्याचं म्हटलं होतं. फडणवीसांच्या टीकेनंतर रोहित पवार यांनी सविस्तर पोस्ट लिहत फडणवीसांच्या टीकेला उत्तर दिलं होतं. यानंतर आता शिंदेंच्या टीकेला उत्तर देताना रोहित पवार यांनी आरोग्याच्या प्रश्नावरून सरकारला टार्गेट केलं आहे.

रोहित पवार यांनी लिहिलं की, “आरोग्याचा वाढता खर्च भागवत असताना राज्याच्या तिजोरीवर प्रचंड ताण येत आहे. अशातच आज एक बातमी वाचायला मिळाली ती म्हणजे आरटीपीसीआर टेस्ट किट, पीपीई किट आणि एन 95 मास्क याचा राज्यांना करण्यात येणारा पुरवठा थाबवण्याचा निर्णय केंद्र सरकारनं घेतला आहे. हा निर्णय म्हणजेच आधीच अडचणीत असलेल्या राज्यांची आणखी कोंडी करण्याचा प्रकार आहे. ही कोरोना प्रतिबंधक साधनं केंद्र सरकारकडून राज्यांना पुरवली जात होती. खरेदी मोठ्या प्रमाणात होत असल्यानं ही साधनं केंद्राला कमी किंमतीत मिळू शकतात. एकीकडे पेशंटची संख्या वाढत आहे अशात साधनांचा पुरवठा बंद करण्याचा निर्णय चुकीचा आहे.”

जीएसटी विषयक मुद्द्यांचाही रोहित पवार यांनी उल्लेख केला आहे. ते म्हणतात, “सर्वच राज्ये आज संकटात आहेत. त्यामुळं केंद्र सरकारनं राज्यांना त्यांचे हक्काचे जीएसटीचे पैसे देणं गरजेचं होतं. परंतु ते देण्याऐवजी केंद्र सरकारनं कर्ज घ्यायला सांगितलं आहे. आता तर केंद्रानं सुरक्षा साधनांचा पुरवठा देखील थांबवण्याचा निर्णय घेतला आहे. याला जबाबदारी घेणं म्हणत नाहीत. माझी केंद्र सरकारला नम्र विनंती आहे की, त्यांनी या निर्णयाचा पुनर्विचार करावा.”